घरताज्या घडामोडीएकनाथ खडसे, सचिन अहिर डेंजर झोनमध्ये?

एकनाथ खडसे, सचिन अहिर डेंजर झोनमध्ये?

Subscribe

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांना पराभूत केल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच विधान परिषद निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असल्याने अपक्ष, लहान पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील नाराज आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार डेंजर झोनमध्ये असल्याची कुजबूज त्यांच्याच पक्षांतील नेत्यांकडून खासगीत सुरू आहे.

या निवडणुकीत धनशक्तीचा प्रभाव राहणार असून त्याचा फटका गरीब उमेदवाराला बसणार आहे.२०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करीत युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून निवडून जाण्याचा मार्ग सुकर केला होता. त्याची बक्षिसी अहिर यांना उमेदवारी देऊन करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. याआधी वरळीची जागा सोडणारे सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवून पक्षनिष्ठेचे फळ देण्यात आले होते, तर राज्यपाल नामियुक्त कोट्यातील उमेदवारी रखडल्याने राष्ट्रवादीकडूनही एकनाथ खडसे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे, परंतु या दोघांच्याही उमेदवारीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये नाराजी आहे.

- Advertisement -

दुसरा पसंतीक्रम धोक्याचा

सचिन अहिर विजयी झाल्यास ते स्वत:, शिंदे आणि आदित्य यांच्या रूपाने 3 नेते वरळी या एकाच मतदारसंघाचे सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याऐवजी सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देता आली असती, शिवाय राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर यांचे अजूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. शिवाय आर्थिकदृष्ठ्या सक्षम असलेले अहिर पहिल्या पसंतीची मते घेणार असल्याने सामान्य कार्यकर्ता असलेल्या दुसर्‍या पसंतीच्या आमशा पाडवी बळीचा बकरा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिर यांनी दुसर्‍या पसंतीची मते घ्यावी, असे सेना आमदारांना वाटत आहे, तर एकनाथ खडसे यांच्याऐवजी पक्षातील एकनिष्ठ नेत्याला उमेदवारी मिळायला हवी होती, असे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना वाटत आहे.

- Advertisement -

खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये, तर अहिर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत. एका अर्थाने काही आमदारांसाठी हे दोन्हीही उमेदवार कानामागून आले आणि तिखट झाले असेच आहेत. भाजप सोडताना खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती, तर शिवसेनेत विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक असताना त्यांना डावलून अवघ्या ३ वर्षांपूर्वी आलेल्या अहिर यांना उमेदवारी दिल्याने सेनेत अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यांना ही नाराजी अडचणीची ठरू शकते, तर भाजप या निवडणुकीत संधी साधून एकनाथ खडसेंचा वचपा काढण्याची शक्यता आहे. खडसे दुसर्‍या पसंतीचे उमेदवार असल्याने त्यांचा पराभव करणेही फडणवीस यांना सोपे जाऊ शकते.
दुसरीकडे काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे आर्थिकदृष्ठ्या पॉवरफुल असलेले प्रसाद लाड यांच्यात लढत झाल्यास हंडोरे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकते. काँग्रेसचे भाई जगताप हे विधान परिषद निवडणूक लढविण्यात माहीर आहेत. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांची भिस्त पक्षाच्या आमदारांवर आणि नेत्यांवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -