मुंबई : राज्यात सध्या महायुतीच्या तीनचाकी सरकारचा कारभार हा गुण्यागोविंदाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, या तीनचाकी सरकारमध्ये काहीच आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण आता उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण राहणार आहे. साखर कारखानदारांबाबत आठ दिवसांपूर्वी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय काल (ता. 30 ऑगस्ट) राज्य सरकारकडून मागे घेण्यात आला. ज्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडून जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे. परंतु आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना डिवचण्याचे काम केले आहे. अजितदादा यांच्यासारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी सीनियर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही लागेल, असा टोला खडसेंनी लगावला आहे. (Eknath Khadse criticizes Deputy CM Ajit Pawar)
हेही वाचा – INDIA आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून महामंथनचे आयोजन
यावेळी जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशाला देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती म्हणजे एक प्रकारे अजितदादांची मानहानी करण्याचा प्रकार आहे. अजित पवार यांच्या अधिकारावर मर्यादा आल्यासारखे आहे. वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी जे अधिकार घेतले त्यावर आता फडणीसांचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक फाईल ही फडणवीसांकडे जाईल त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे जाईल, अशी टिप्पणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस हे सीनियर उपमुख्यमंत्री आहेत. आता अजितदादा यांच्यासारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी सीनियर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही लागेल, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना डिवचण्याची संधी सोडली नसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी खडसेंना मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात असता, त्यांनी सांगितले की, साऱ्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांमध्ये आपसात मतभेद दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर डोळा होता, मात्र ते मिळणारच नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा नाद सोडला, अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.