…पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, खडसेंनी अजित पवारांसमोर व्यक्त केली नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातल्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर अजित पवारांसमोरच नाराजी व्यक्त केली.

जळगावमधल्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू होता. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात. परंतु कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी नाराजी खडसे यांनी व्यक्त केली. ओके आणि खोके म्हणून चालणार नाही, पक्षाने आक्रमक व्हायला पाहिजे.

एकनाथ खडसे यांचं भाषण सुरु असतानाच सभागृहातली लाईट दोन वेळा गेली. परंतु लाईट गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावून घोषणाबाजी केली. राज्यातील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यातल्या इतिहासात जेवढं घाणेरडं राजकारण झालं नसेल तेवढं आता होत आहे. हे सराकार पाडू ते सरकार पाडू, ही भाषा अलिकडच्या राजकारणात वाढत चालली असून ती योग्य नाही, असंही खडसे म्हणाले.

आमच्या जिल्ह्यात बाळासाहेबांच्या पुण्याईमुळं निवडून आलेले पाच आमदार शिंदे गटासोबत गेले, पण यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत खडसेंनी शिंदे गटाला इशारा दिला.


हेही वाचा : मुंबईत २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने सुरु होणार ‘पॉलिक्लिनिक’