घरताज्या घडामोडीखडसे-फडणवीस 'टेबलटॉक' चर्चा; बैठकीनंतर खडसे महाजनांसोबत रवाना!

खडसे-फडणवीस ‘टेबलटॉक’ चर्चा; बैठकीनंतर खडसे महाजनांसोबत रवाना!

Subscribe

भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या दोघांशी अर्धा तास टेबलटॉक चर्चा झाली. या चर्चेमध्ये काय झालं, हे मात्र कुणीही सांगायला तयार नाही.

भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उघड वक्तव्यांमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. निवडणुकांपासून अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या खडसेंनी नुकतेच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची जाहीररीत्या नावं घेऊन थेट टीका केली. त्यामुळे खडसे-फडणवीस आणि खडसे-महाजन हा वाद टोकाला जाण्याची शक्यता असतानाच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे तिनही नेते एकत्र आल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि खुद्द एकनाथ खडसे ‘टेबल टॉक’ करताना दिसले. एवढंच नाही, तर बैठकीनंतर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच गाडीतून जाताना दिसले. त्यामुळे या तिघांमधला वाद शमला असल्याचं बोललं जात आहे.

‘कसली नाराजी? कसली चर्चा?’

दरम्यान, बैठकीनंतर एकनाथ खडसेंना पत्रकारांनी विचारलं असता बैठकीत नाराजीवर चर्चाच झाली नसल्याचं खडसेंनी सांगितलं. ‘जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली होती. तेव्हा त्यांनी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला सांगितलं. म्हणूनच आज फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये फक्त निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असून त्यापेक्षा इतर कोणत्याही मुद्द्यावर आमची चर्चा झालेली नाही’, असं खडसे म्हणाले.

- Advertisement -

khadse mahajan fadnavis

‘नाथाभाऊ आणि मी एका ताटातच जेवलो’

गिरीश महाजन यांनी देखील यासंदर्भात अशीच प्रतिक्रिया दिली. आम्ही तिघं एकत्रच होतो. सोबतच जेवलो आम्ही. मी आणि नाथाभाऊ तर एकाच ताटात जेवलो. आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भेट झाली. देवेंद्र फडणवीसजी धुळे-नंदुरबारकडे जाताना इथे थांबले होते. तेव्हा आम्ही उमेदवारांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. आता देवेंद्रजी पुढच्या प्रवासाला निघाले आहेत आणि आम्ही फॉर्म भरायला निघालो आहोत. भाजप एकसंघटितच आहे. या निवडणुकीनंतर तुम्हाला कळेलच. थोडंसं संभाषण कमी झाल्यामुळे दुरावा निर्माण होतोच. पण यापुढे आम्ही निश्चितच एकत्र दिसू’, असं गिरीश महाजन म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार-अशोक चव्हाण यांच्यात जुंपली!

दरम्यान, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या तिघांकडूनही सारंकाही आलबेल झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असलं, तरी खरंच वाद मिटले आहेत की हा फक्त मनोमिलनाचा फार्स होता, हे मात्र येत्या काही काळात स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -