राज्यात भोंग्यांवरुन जे काही चाललंय ते मनोरंजन म्हणून पाहा, एकनाथ खडसेंचे वक्तव्य

Eknath Khadse slams bjp and mns and appeal citizen what is going on in the state for the sake of entertainment

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेकडून मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मशिदींवरील भोंगे काढावेत अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु सभा आणि भोंग्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. या सगळ्या गोंधळामध्ये राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे हा गोंधळ मनोरंजन म्हणून पाहा फार गांभीर्याने घेऊ नका असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना टोला लगावला आहे. सध्या राज्याच्या राजकारणातील वातावरण गढूळ झालं आहे. हा बोलला की त्याला उत्तर दे असं एकमेकाविरोधात टीका-टिप्पणी सुरु आहे. गेल्या ४० वर्षांत मी अस काही अनुभवलं नव्हतं, हे जे काही चाललं आहे, ते मनोरंजन म्हणून पाहा. ते फार गांभीर्याने घेऊ नका. भोंगा काढला काय, राहिला काय, तुमचं पोट भरणार नाही असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

खडसेंचा विरोधकांवर निशाणा

राज्यात दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण वेगळं आहे. एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण मी आजपर्यंत नाही पाहिलं, सदावर्ते आले तर त्यांचा मुद्दा सुरु असतो. यानंतर हनुमान चालिसा मुद्दा काही दिवस चालतो. पुन्हा भोंग्यांचा मुद्दा चालतो. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण होते मग मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे भाषण होते. त्यावर पुन्हा देवेंद्र फडणीस, नारायण रााणे यांची भाषणं होतात. कोणाच्या भाषणावर मी टीका नाही करत आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी असं कधी घडलं नाही. हा माथी भडकवण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे.


हेही वाचा : LIC चे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी तोट्यात, 8.62% च्या घसरणीसह शेअर्सची लिस्टिंग