एकनाथ खडसेंच्या समर्थकाला भरचौकात महिलांकडून चोप, रोहिणी खडसे पोलीस ठाण्यात आक्रमक

एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला जळगावमध्ये दोन महिलांनी भररस्त्यात चोप दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर, हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यावरही रोहिणी खडसे यांनी पोलिसांसोबत वाद घातला. दोन्ही बाजूंनी याप्रकरणी गंभीर आरोप होत असल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जळगावात मुक्ताईनगरमध्ये भरचौकात दोन महिलांनी एकनाथ खडसे समर्थकाला तुफान मारहाण केली. त्यामुळे रस्त्यांवर बघ्यांची गर्दी झाली होती. महिलांकडून शिवीगाळ आणि मारहाण सुरू असल्याने गर्दी वाढत गेली. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे या समर्थकाला मारहाण झाली असं म्हटलं जात आहे. दरम्यान, हे प्रकरण एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे त्या चांगल्याच आक्रमक झाल्या. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे.

रोहिणी खडसे यांनी काही कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे गाठलं. यावेळी रोहिणी खडसेंनी पोलिसांसोबत वादही घातली. कार्यकर्त्यांनी याविरोधात पोलीस ठाण्याच्या दालनात ठिय्या आंदोलनही केलं. मात्र, यावेळी पोलिसांनी त्यांना हाकलून दिल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली. त्यामुळे पोलिसांसोबत वाद वाढला असंही खडसे म्हणाल्या. दरम्यान, हे प्रकरण अद्यापही शमलेलं नाही.