खेडमध्ये फुसका बार येऊन गेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

संग्रहित छायाचित्र

खेडः काही दिवसांपूर्वी येथे एक फुसका बार येथे येऊन गेला. आपटी बार म्हणतात ना, तसा तो बार होता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

रविवारी खेड येथील गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यात सुरुवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी येथे एक फुसका बार येऊन गेला. आपटी बार म्हणतात ना, तसा तो बार होता. त्याला मी उत्तर द्यायला आलेलो नाही. त्यांना मी काय उत्तर देणार. त्यांचा तोच तोच थयथयाट सुरु आहे. तोच खेळ सुरु आहे. आता सर्कसी प्रमाणे त्यांचे शो होणार आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला.

आम्ही गद्दारी केली नाही. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडे गहाण ठेवले होते. ते आम्ही सोडवले. निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही विचारांशी तडजोड केलीत. त्यामुळेच आम्ही वेगळे झालो. निवडणूक आयोगालाही आमची भूमिका पटली. म्हणूनच आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. आता शिवसेना वाढवायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सत्ता येते जाते. पण एकदा गेलेले नाव पुन्हा मिळवता येत नाही. देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्यांसोबत तुम्हाला राहायचे आहे की ३७० कलम हटवणाऱ्यांसोबत राहायचे आहे. सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने तुम्ही बघत आहेत. बाळासाहेबांनी राहुल गांधी यांना कधीच जवळ केले नाही. त्यांना तुम्ही जवळ करत आहात. जो पक्षाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. ते राहुल गांधी तुम्हाला हवे आहेत. आम्हाला तुमचे पैसे नकोत. बाळासाहेबांचे विचार हवे आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.