अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

eknath shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांना काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, ते आज सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार होते. मात्र, त्यांनी पत्रकार परिषद न घेता ट्विट करत घटक पक्षामुळे शिवसेनेला तोटा झाल्याचं म्हटलं आहे. (Eknath Shinde Answer to uddhav Thackeray on MVA controversy)

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.  घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे  महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे उद्धव ठाकरेंची ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकवल्याचं म्हटलं जात आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

फेसबूक लाईव्ह दरम्यान, जे आमदार गेले त्यांनी येऊन माझा राजीनामा (resignation) घ्यावा आणि तो राज्यपालांना द्यावा. मी राजीनामा घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोरोना झाला आहे. ज्या शिवसैनिकाला वाटते मी पक्ष प्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी दोन्ही पदे सोडतो. पण हे शिवसैनिकानेच सांगायला हवे. इतर कोणी हे सांगितले तर चालणार नाही. पण मी मुख्यमंत्री पद सोडले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला हवा. पण मला येऊन बोला किंवा तिकडून फोन करून सांगा. तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला मी नको आहे, तर मी पद सोडेन. हे माझे नाटक नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे आपण मुख्यमंत्री पद स्विकारल्याचं उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह दरम्यान म्हटलं होतं. त्यामुळे माझ्या शिवसैनिकांना वाटत असेल की मी या पदासाठी नालायक आहे तर माझ्यासमोर येऊन सांगा. मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे. मी आताच वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर जातो, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा – मी मुख्यमंत्री पद सोडेन पण…, उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

एकनाथ शिंदे यांचं उत्तर

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. ते आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवादही साधणार होते. मात्र, त्यांनी पत्रकार परिषद न घेता ट्विटरवरून महाविकास आघाडीतील घटकपक्षावर हल्लाबोल केला.

घटकपक्षामुळे शिवसैनिक भरडला गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आघाडीचा फायदा फक्त घटक पक्षातील नेत्यांनाच झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. या आघाडीमुळे आघाडीतील पक्ष मजबूत बनले पण शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही वाचा – जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

‘माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर आता काय करायचे. ते आता इथे नाहीत. त्यामुळे मी त्यांना माझे कसे बोलायचे. सूरत किंवा इतर कुठून का बोलायचे. एकाने जरी माझ्याविरोधात मतदान केले तर ते माझ्यासाठी लाजिरवाणे असेल. त्यामुळे माझ्याविरोधात अविश्वास ठराव नको. पण तुम्ही पुढे येऊन मला सांगा मी पद सोडेन’, असेही उद्धव यांनी म्हटले होते.

मात्र, यावर काहीच प्रतिक्रिया न देता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. ही अनैसर्गिक आघाडी असून महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केलं आहे.

हेही वाचा – ठाकरे मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ