बंडाच्या ४८ तासाआधी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं

शिंदे यांच्या बंडनाट्याच्या दोन दिवसाआधीच पक्षांतर्गत वाद झाल्याचे समोर आले आहे.

eknath shinde

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर झाले असून कुठल्याही क्षणी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान, शिंदे यांच्या बंडनाट्याच्या दोन दिवसाआधीच पक्षांतर्गत वाद झाल्याचे समोर आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीआधी पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये आमदारांच्या राहण्याची सोय केली  होती. यावेळी मतदानाच्या मुद्दयावरून नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. काँग्रेसला अतिरिक्त मत देत त्यांच्या उमेदवाराला निवडून देता येईल का या मुद्दयावरून नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यास शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यावेळी शिंदे विरोधामागची आपली बाजू मांडत होते.  त्यावर संजय राऊतांनी शिंदेना हटकले त्यास आदित्य ठाकरेंनीही समर्थन दिले. यावरून या तिघांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. यामुळे शिंदे दुखावले गेले.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफूसीमुळेही शिंदे नाराज होते. मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला डावलण्यात येत असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवत होते. आपली ही नाराजी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कानावरही घातली होती. पण तरीही त्यावर ठाकरे यांनी कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे शिंदे अधिकच दुखावले होते. यासर्व गोष्टींचा कडेकोट झाल्यानेच शिंदे यांनी बंड पुकारल्याचे बोलले जात आहे.