ठाणे – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण अंगिकरून आज शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे. त्यांचे विचार अंगिकारून वाटचाल करताना गेली अडीच वर्षे आम्ही लोकाभिमुख कामकाज करण्याचा प्रयत्न केला. शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या लोकाभिमुख योजना राबवल्या. त्या माध्यमातून तळागाळातील माणसाला योजनांचा लाभ मिळवून दिला, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटावर शरसंधान साधले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपूर्वी वेगळा निर्णय घेतला. त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कुणाची ते सिध्द करून दाखवले आहे. जनतेने दिलेल्या पाठबळाच्या जोरावर शिवसेनेचे 80 पैकी 60 आमदार निवडून आले. तर अमच्यावर टीका करणाऱ्यांचे 97 पैकी केवळ 20 आमदार निवडून आलेत. गेली अडीच वर्षे माझ्यावर दररोज टीका करण्यात आली, पण टीकेला प्रत्युत्तर देत बसण्यापेक्षा मी टिकेला कामातून उत्तर दिले. अखेर जनतेने दिलेल्या कौलानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली असून त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अजूनही सुधारले नाही तर 20 समोरचा शून्य केव्हा उडून जाईल आणि फक्त 2 व्हायला वेळ लागणार नाही, असा जोरदार टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
आज बाळासाहेबांचे हिंदुत्त्ववादी विचार पुढे घेऊन जाणारे सरकार सत्तेत असून, शिवसेना ही आज महायुती सरकारचा भाग आहे. त्यामुळे लोकांना आणि लोकांसाठी काम करणारी संघटना म्हणून शिवसेना आपले कार्य यापुढेही अविरतपणे चालू ठेवेल असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी परिवहन सभापती विलास जोशी, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.