मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही मतदारांचा कौल आपल्यालाच मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. या सगळ्या धामधुमीत एक मुद्दा चर्चेचा होता तो म्हणजे, निवडणूक जिंकल्यानंतर मविआ असेल किंवा महायुती, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याची. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे. (eknath shinde big statement before maharashtra election voting im not in race for cm post)
महायुतीतील तीनही घटक पक्षांचे प्रमुख हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे बरीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी देखील आपण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसल्याचे सांगितले आहे. तर रविवारी, मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आपण या शर्यतीत नसल्याचे सांगत चांगलाच धक्का दिला आहे. दरम्यान, विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देखील अद्याप ठरलेला नाही.
हेही वाचा – Ratnagiri : रत्नागिरीत वंचितच्या उमेदवारावर हल्ला; प्रचाराच्या रणधुमाळीत गुहागरमध्ये खळबळ
निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न मध्यंतरी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला होता. तेव्हा निवडणुकीनंतर आम्ही सगळे पक्ष मिळून ठरवू असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यातच या प्रमुख तीनही नेत्यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसल्याचे सांगत सस्पेन्स अधिकच वाढवला आहे.
विधानसभेसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच्या आधीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी, मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, हे मात्र त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.
या मुलाखती दरम्यान एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसवर मजबूत हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट कधी म्हणतील, अशी विचारणा त्यांनी राहुल गांधी यांना केली. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंवर टीका करताना आपल्या स्वार्थासाठी ते कॉंग्रेससोबत गेल्याचे सांगितले. त्यांनी भाजपाच्या पाठीत सुरा खुपसल्याचे देखील ते म्हणाले. जर आज बाळासाहेब जिवंत असते तर, त्यांनी उद्धव ठाकरेंना जंगलात जाऊन वन्यप्राण्यांचे फोटो काढायला सांगितले असते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Mahim Constituency : अमित ठाकरेंचे डिपॉझिट वाचले तरी…; सदा सरवणकरांची खोचक टीका
महाराष्ट्रात यावेळी मविआ आणि महायुती आमने – सामने आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. तर मविआमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी – शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सहभाग आहे. (eknath shinde big statement before maharashtra election voting im not in race for cm post)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar