मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्वच पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबिज करायची आहे, असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. (Eknath Shinde big statement regarding local body elections)
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कारण खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही आणि होणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादाने आतापर्यंत सर्व काही मिळालं आहे. मला मुख्यमंत्रीपद मिळाले आणि जनतेची सेवा करता आली. जनतेच्या आयुष्यात बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी करण्याची संधी मला मिळाली. राज्यातील 2 कोटी 40 लाख बहिणींचा सख्खा भाऊ आणि लाडका भाऊ म्हणून अशी आपल्याला ओळख मिळाली. ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. असे म्हणत खुर्चीची लालसा कुणाला आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आपल्याला कधीच खुर्चीची लालसा नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, शिंदेंचा ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे म्हणाले की, जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है और जो तुफानों में पलते है, वही दुनिया बदलते है… म्हणून आम्ही उठाव केला. कारण कोणत्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. अडीच वर्षात मी किती वर्षाचे काम केले, त्याचे मोजमाप तुम्ही करा, असे आवाहन शिंदे यांनी जनतेला केले.
महापालिका ते ग्रामसभा काबिज करायचीय
दरम्यान, “अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, पुरा आसमाँ बाकी है” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबिज करायची असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, पुढील वर्ष बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक, हे आपले मिशन आहे. बलशाली शिवसेना ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. तेच बाळासाहेबांचे खरे स्मारक ठरेल. शिवसैनिकाला काही अशक्य नाही. “काम करो ऐसा एक पहचान बन जाये, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाये, जिंदगी तो हर कोई काट लेता है, इसलिए जिंदगी ऐसी जियो की मिसाल बन जाये, अशी शेरोशायरी करत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
हेही वाचा – Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो, शिंदेंची ठाकरेंवर टीका