Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र एकनाथ शिंदेंनी मोडला नारायण राणेंचा विक्रम; कार्यकाळात उद्धव ठाकरेच ठरणार सरस

एकनाथ शिंदेंनी मोडला नारायण राणेंचा विक्रम; कार्यकाळात उद्धव ठाकरेच ठरणार सरस

Subscribe

उन्मेष खंडाळे

मुंबई – शिवसेनेत बंडाळी करुन सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडव्याला ८ महिने २२ दिवस पूर्ण केले आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या या कालावधीत एक महत्त्वाचा विक्रम मोडला असून, एक विक्रम आपल्या नावे केला आहे. वेगवान पद्धतीने एकनाथ शिंदेंनी नारायण राणेंचा ८ महिने १७ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहाण्याचा विक्रम मोडला आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहाणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्यापुढे आता अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेले उद्धव ठाकरे क्रमांक दोनवर आणि क्रमांक एकवर मनोहर जोशी आहेत. शिंदेंनी शिवसेना नाव आणि चिन्हा धनुष्यबाण मिळवले असले तरी उद्धव ठाकरेंएवढा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता कमीच आहे.
शिवसेनेचे आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले आहेत. यापैकी एकानेही मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. नारायण राणे हे आता सर्वाधिक कमी कार्यकाळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेले नेते ठरले आहेत. ते आता शिवसेनेत नसले तरी शिवसेनेच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या यादीत ते आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी राणेंचा ८ महिने १७ दिवसांचा विक्रम मोडत ८ महिने २२ दिवस मुख्यमंत्री पदावर राहाण्याचा विक्रम केला आहे. मात्र शिंदेंनाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही अशी परिस्थिती आहे.

- Advertisement -

… तरी उद्धव ठाकरेंच्या एक पाऊल मागेच
एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत बंड करुन त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा खटला सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला असून एप्रिलच्या सुरुवातीला निर्णय येण्याची शक्यता आहे. हा निर्णय जर शिंदेंच्या विरोधात गेला तर त्यांचे मुख्यमंत्रीपदही आठ महिने काही दिवसांचेच ठरण्याची शक्यता आहे. दुसरे असे की, या विधानसभेचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळेही त्यांना पाच वर्षांचा पूर्ण काळ मिळणार नाही. तिसरी शक्यता आहे की, २०२४च्या लोकसभेसोबत जर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली तर, एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ हा आणखीनच कमी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या यादीत ते उद्धव ठाकरेंच्या मागेच राहाण्याची शक्यता अधिक आहे.

उद्धव ठाकरे हे २ वर्षे ६ महिने २९ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांना ऑक्टोबर २०२४ पर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मध्यवाधीचे विघ्न आले नाही तर शिंदेंना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१९ विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण केला तरी मुख्यमंत्रीपदावर ते २ वर्षे ३ महिने २४ दिवसच राहू शकतात. त्यानंतर विधानसभा निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिल. मात्र हा कार्यकाळ उद्धव ठाकरेंच्या ३० महिने २९ दिवसांपेक्षा जास्त असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे काही झाले तरी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा एक पाऊल मागेच राहाणार हे निश्चित आहे.

- Advertisement -

शिवसेनेतील एकाही मुख्यमंत्र्याला पुन्हा या पदावर येण्याची संधी मिळालेली नाही. मग ते शिवसेनेत राहिले किंवा शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेले तरी त्यांना, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होता आलेले नाही, हा देखील आतापर्यंतचा इतिहास आहे. एकनाथ शिंदे हा इतिहास बदलतात का, हे पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना नेत्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
मनोहर जोशी – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ – ३ वर्षे १० महिने १६ दिवस
नारायण राणे – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ – ८ महिने १७ दिवस
उद्धव ठाकरे – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ – २ वर्षे ६ महिने २९ दिवस
एकनाथ शिंदे – ३० जून २०२२ मुख्यमंत्री – विद्यमान मुख्यमंत्री

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -