HomeठाणेEknath Shinde : दरे गावाहून एकनाथ शिंदे ठाण्यात परतले; प्रकृतीमध्येही सुधारणा

Eknath Shinde : दरे गावाहून एकनाथ शिंदे ठाण्यात परतले; प्रकृतीमध्येही सुधारणा

Subscribe

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रि‍पदावरून अनेक चर्चा सुरू आहेत. अशामध्ये सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी जाऊन राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची प्रकृती खालावल्याचीदेखील बातमी समोर आली होती. पण रविवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी 5.15 च्या सुमारास ठाण्यातील त्यांच्या खासगी निवासस्थानी परतले. प्रकृती बिघडल्यामुळे 2 दिवस ते आपल्या गावीच मुक्कामी होते. आता आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. (Eknath Shinde caretaker cm return to his thane home from dare satara native home)

हेही वाचा : Shiv Sena Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी दिले असे उत्तर 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपली प्रकृती आता सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर दीपक केसरकर यांच्यासमवेत ते आपल्या ठाण्यातील खासगी निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेदेखील उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी महायुतीने तयारी जरी केली असली तरीही अद्याप अधिकृतरीत्या कोणाचेही नाव घोषित केलेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रि‍पदावरचा दावा सोडल्याचे जाहीररित्या सांगितले होते. तसेच, भाजपच्या म्हणजेच अमित शहा आणि पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला पाठींबा असल्याचेदेखील ते म्हणाले होते.

दरम्यान, या महायुतीच्या सरकारमध्ये काय फॉर्म्युला वापरला जावा? यासाठी तीनही प्रमुख नेत्यांमध्ये 28 नोव्हेंबरला नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर 29 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे गावी गेले होते. यावेळ त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, ‘आपण नाराज नसून फक्त आराम करण्यासाठी गावी आलो आहे,’ असे त्यांनी सांगितले होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले. आता रविवारी (1 डिसेंबर) ते ठाण्यात परतले असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, त्यांना डॉक्टरांनी काहीकाळ आरामाचा सल्लादेखील दिला आहे.


Edited by Abhijeet Jadhav