घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री

Subscribe

महाराष्ट्राचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे आणि फडणवीस यांना शपथ दिली. या शपथविधीमुळे गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळाला असून राज्यात शिंदे सरकार कार्यरत झाले आहे. राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता शिंदे सरकारचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या सुरुवातीलाच शिंदे यांनी हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करत ईश्वर साक्षीने शपथ घेतली. यावेळी शिंदे समर्थकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. शिवाय जय भवानी, जय शिवाजीचाही गजर झाला. शपथविधीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रालयात पहिली कॅबिनेट बैठक घेत कामकाजाला सुरूवात केली.

केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरुन फडणवीस उपमुख्यमंत्री

नरेंद्र मोदींचा फोन, जेपी नड्डांची सूचना

राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर भाजपने आपले धक्कातंत्र कायम ठेवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. ही घोषणा करताना मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझी जबाबदारी असेल, असेही फडणवीस म्हणाले होते.

- Advertisement -

या घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे ही भाजपच्या केंद्रीय टीमची इच्छा आहे, अशी सूचना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तासाभरातच करीत फडणवीसांनाच अनपेक्षित धक्का दिला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा फोन केल्यानंतर अखेर फडणवीस यांनी जड अंतकरणाने गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जगजाहीर आहे. तरीही त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत स्वत: सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

त्यामुळे शिंदे सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हाती राहील असे म्हटले जात होते. त्यानुसार राजभवनात शपथविधीची तयारी झाली. राज्यपालांसह नव्या मुख्यमंत्र्यांसाठी व्यासपीठावर केवळ दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या, परंतु अचानक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन राज्यातील सत्तेत सहभागी व्हावे, अशी विनंती केली. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना विनंती केली. या विनंतीनंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला. त्यामुळे ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांकडून शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घडामोडींवरून फडणवीसांच्या मनाविरोधात केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांना ऐनवेळी मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावरून फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याने फडणवीस यांचे डिमोशन झाल्याचेही म्हटले जाऊ लागले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध

 राज्याच्या राजकीय इतिहासात गुरुवारचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि तितकाच उत्कंठावर्धक ठरला. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यापासून एकामागोमाग एक नाट्यमय घटना घडल्या. राज्यात आजच नवे सरकार स्थापन होईल असे जवळपास निश्चित झाले होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि ते एकटेच शपथ घेतील, असे जाहीर करून खळबळ उडवून दिली. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

मात्र त्यानंतर भाजपमध्ये अचानक चक्रे फिरली. फडणवीस हे पक्ष संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे, असे पक्ष निर्देश देत असल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे जाहीर केले.

एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. राजभवनाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत फक्त एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीची तयारी केली होती. शपथविधीच्या ठिकाणी व्यासपीठावर राज्यपाल आणि शपथ घेणारे मुख्यमंत्री यांच्यासाठी दोन खुर्च्या होत्या, मात्र फडणवीस शपथ घेणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर व्यासपीठावर आणखी एक खुर्ची आणली गेली. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली सूत्रे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. मंत्रालयात प्रवेश करताच शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

 शिंदे महाराष्ट्राचे चौथे सातारकर मुख्यमंत्री

 शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. धार्मिक, कनवाळू, ऊन, वारा, पावसाला न जुमानता गरजूंच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे महाराष्ट्राला परिचित आहेत, पण याव्यतिरिक्त शिंदे यांची अजून एक वेगळी ओळख आता अधोरेखित झाली आहे. ती आहे सातार्‍याची. कारण शिंदे हे मूळचे सातार्‍याचे असून त्यांच्या रूपाने राज्याला चौथा सातारकर मुख्यमंत्री लाभला आहे.

याआधी मुख्यमंत्रीपद भूषविलेले यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हेदेखील सातार्‍याचे होते. याबद्दल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विटमधून आनंद व्यक्त केला असून शिंदे यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आहिर येथे झाला आहे, तर त्यांचे मूळ गाव हे दरे तालुका जावळी आहे. शिंदे शिक्षण आणि नोकरीसाठी ठाण्यात आले आणि कायमचे ठाणेकर झालेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली जाईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

बाळासाहेब, दिघेंचे विचार पुढे नेणार -एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेच्या आशा-आकाक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण दिवसरात्र झटू. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार आपण पुढे नेऊ, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाची घोषणा करून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला आहे. स्वतःचा पक्ष सर्वांत मोठा असूनही त्यांनी स्वतःकडे पद न घेता ते मला दिले. इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी पाहिला नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानले.

या सगळ्यामागे आमच्यापैकी एकाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष ११ असे एकूण ५० आमदार एकत्र आहेत. नैसर्गिक युती तोडून आघाडी स्थापन झाली, पण अनेक अडचणी होत्या. मतदारसंघातील अडचणी होत्या. त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली, पण त्यातून मार्ग निघाला नाही. शेवटी आम्हाला हा मार्ग निवडावा लागला. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकार-ल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात कॅबिनेट बैठक घेत लोकांना अपेक्षित असलेली आणि प्रलंबित कामे करणार असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शनिवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन

 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी २ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे.येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता अधिवेशनात एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. संख्यबळानुसार शिंदेगट यांच्याकडे ५० आमदार तर भाजपकडे १२० आमदारांचे संख्याबळ आहे. बहुमतासाठी १४४ मॅजिक फिगर असून शिंदे यांना बुहुमत सिद्ध करण्यात अडचण येणार नाही असे दिसते.

पक्षाचा आदेश शिरोधार्य
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

शिंदे सरकारचे अभिनंदन
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदेजी यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन करतो. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा! -उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. -राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक अभिनंदन. हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासह विकासाचा गाडादेखील वेगाने पुढे हाकतील अशा सदिच्छा व्यक्त करतो.
-अजित पवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होताना समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही ही आशा.बाळगतो. – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -