Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदावरून फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी

एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदावरून फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी

Subscribe

शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपद बहाल केल्याने फडणवीस यांच्या मोठ्या मनाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यास फडणवीस यांचाच विरोध होता अशी माहिती समोर येत आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच जोर का धक्का दिला. शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपद बहाल केल्याने फडणवीस यांच्या मोठ्या मनाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यास फडणवीस यांचाच विरोध होता मात्र केंद्रीय नेतृत्वानेच तशा सूचना दिल्याने फडणवीस यांना नाईलाजाने शिंदे यांच्या नावाची  मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी लागल्याचे समोर आले आहे. तसेच याच नाराजीतून फडणवीस यांनी सरकारमध्ये न राहता बाहेरून सरकार चालवणार असल्याचे सांगितले होते. अशी माहिती पुढे येत आहे.

फडणवीस यांची हीच नाराजी ओळखून केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी काहीवेळा आधी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी सूचना केली. देवेंद्र फडणवीस यांच मंत्रिमंडळात असणं फार महत्वाच आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशा सूचना नड्डा यांनी दिल्या. पण त्यावर फडणवीस यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. दरम्यान फडणवीस यांनी आपल्याला पक्षविस्ताराकडे लक्ष द्यायचे असून प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे असे पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे कळते. पण त्यांची ही मागणी केंद्रीय नेतृत्वाने अमान्य केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट केले. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांना दोन वेळा फोन करत त्यांची समजूत काढली. त्यानंतर राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

दरम्यान, पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचे नाव जाहीर केले तेव्हा सगळ्यांबरोबरच भाजपच्या नेत्यांनाही धक्का बसला. कारण शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हायकमांडने का आणि केव्हा दिला याबाबत कोणालाही काही माहित नव्हते किंवा तसे सूचित करण्यात आले नव्हते. फडणवीसच मुख्यमंत्री होणार याच विचाराने भाजप नेते, कार्यकर्ते आणि फडणवीस यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या नावाची घोषणा केल्याने आपल्याला धक्काच बसला. तर फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये याबद्दल नाराजीचे वातावरण आहे. एवढेच नाही शिंदेच्या गटातील नेत्यांनाही याबद्दल पुसटशी कल्पना नव्हती. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही आपल्याला याबद्दल काही माहित नव्हते असे सांगितले.

 

- Advertisement -
- Advertisement -
Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -