मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते सत्कार पार पडला. यानंतर विजयोत्सव सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून टीका करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाची चित्रफित दाखवण्यात आली. यानंतर आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार जपल्यामुळे विजयी झालो असल्याचे महत्त्वाचे वक्तव्य केले. (Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray from a rally at BKC)
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या आगोदर कोणी तरी भाषण करेल, असे वाटले होते. पण मला एकट्याला बॅटिंग करायला ठेवलं आहे. असे असले तरी हा भाषणाचा कार्यक्रम नाही. आपण आज विजयोत्सव साजरा करत आहोत. विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला. कारण बाळासाहेबांच्या प्रेरणेने घडलेले आपण शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला, तो विचार आपण कधीच सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला. आज तोच विजयोत्सव आपण साजरा करत आहोत.
अडीच वर्षापूर्वी केलेला उठाव आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा झाली आहे. अनेक पिढ्या या विजयाची नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे यश बाळासाहेबांच्या विचाराचे आणि महायुतीच्या एकजुटीचे आहे. अडीच वर्ष रात्र न् दिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं, लाडक्या बहिणीचं, भावांचं, ज्येष्ठांचं, तरुणांचं आणि शेतकऱ्यांचे हे यश आहे. दोन अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केले आहे. एकही क्षण आपण वाया घालवला नाही. म्हणूनच आपल्याला विजय मिळाला. विकास कामे चौपट पटीने केली. लोकाभिमूख योजना आणल्या आणि विकास केला. दोन्हीची सांगड घातल्यामुळेच राज्यातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, असे शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांनी आपल्याला आज शाबासकी दिली असती
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील विजाय हा बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं मोठं गिफ्ट आहे. बाळासाहेब असते तर आज त्यांनी आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला आहे. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आलो असलो तरी घरी आल्यावर आई उंबरठ्यावर आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद माझ्या मनाला झाला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, साथ दिली त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचा रेकॉर्ड, फडवीसांकडून एकूण गुंतवणुकीची माहिती