मुंबई : एमएमआरडीएच्या माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मात्र याच स्मारकावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी टीका त्यांनी केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. (Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray memorial)
एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेबांनी दिली. त्यामुळे उद्या जर तुम्ही आमदार झालात, खासदार झालात किंवा मंत्री झालात तरी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे विसरू नका. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
हेही वाचा – Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो, शिंदेंची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडे सांभालते है, असे चालत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, असा टोलाही शिदेंनी यावेळी लगावला. तसेच तुम्ही (उद्धव ठाकरे) विधानसभेला 97 जागा लढवल्या आणि 20 जिंकल्या. पण आम्ही 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. मग आता सांगा खरी शिवसेना कोणाची? जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आहे. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन अभी पूरा आसमान बाकी आहे, असेही शिंदेंनी म्हटले.
शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवणार
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला संधी मिळाली. त्याच गोष्टीचा लाभ उठवत आम्ही दुप्पट चौप्पट काम केली आहेत. माझ्यासोबत तुम्ही देखील काम केले आहे. आपण पायला भिंगरी लावून रात्रीचा दिवस करून काम केले आहे. त्यामुळे आपल्याला हा महाविजय मिळाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात इतका मोठा महाविजय मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या महाविजयामुळे आपली आता जबाबदारी वाढली आहे. यासाठी आपल्याला आता चौपट वेगाने काम करावे लागणार आहे. त्यासाठी अहोरात्र काम करायला मी तयार आहे. तसेच हा भगवा डौलाने फडकवत ठेवेल हा शब्द देतो. याशिवाय आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही हे देखील सांगतो. या शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर मायबाप जनतेचा हक्क आहे. तो हक्क कायम राहील, हे वचन देतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – Uddhav Thackeray : औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा काय; उद्धव ठाकरेंचा इशारा