ठाणे : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. कोकण मंडळाकडून या सर्व घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यानंतर या घरांसाठी सुरुवातीला सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती, मात्र त्या मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आणि अखेर आज (5 फेब्रुवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी लोकांचा म्हाडाच्या घरावर विश्वास वाढतोय, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. (Eknath Shinde feels that people trust in MHADA houses is increasing)
म्हाडाच्या घरांची आज लॉटरी काढण्यात आली. 31 हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये लोकांची मागणी वाढत चालली आहे. म्हाडावर जो विश्वास आहे, तो वाढत चालला आहे. म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे. वेळेमध्ये घरं मिळत आहेत. या सिस्टिमध्ये जी कार्यपद्धती आहे, त्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे. त्यामुळे लोकांचा म्हाडावर प्रचंड विश्वास आहे. आज सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली आहे. पोलीस, पत्रकार आणि सामन्य नागरिकांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने म्हाडाची लॉटरी निघत आहे.
गेल्या आठवड्यात आम्ही पिंपरी-चिंचवडच्या 6 हजार 400 घरांची लॉटरी काढली. यानंतर पुढच्या तीन-चार महिन्यांमध्ये आणखी लॉटरी काढली जाईल. आज ज्यांना घरं मिळाली त्याचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाही, त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या लॉटरीत त्यांनाही घरं मिळतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Mahayut News : अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांवर राहणार आता भाजपचा ‘वॉच’, घेतला ‘हा’ निर्णय
पुढच्या पाच वर्षात 8 लाख घरं बांधण्याचं म्हाडाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशी तरतूद आम्ही पॉलिसीमध्ये करत आहोत. तसेच परवडणारी रेंटल घरं, त्याचबरोबर वर्किंग व्युमन, गिरणी कामगार, डब्बे वाले, पोलीस, पत्रकार यांच्यासह अनेकांचा समावेश आम्ही नवीन धोरणामध्ये करत आहोत. समाजातला वंचित जो सर्वसामान्य घटक आहे, त्याला म्हाडामध्ये हक्काचं आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे, असे शिंदे म्हणाले.
प्रलंबित प्रकल्पांचा मार्ग मोकळा करणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरे मिळत आहेत. या योजनेला आपण महाराष्ट्रात चालना देत आहोच. म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजेत. म्हाडा देखील समूह विकास आणि एकत्रित विकासाला प्राधान्य देत आहोत. जे प्रकल्प रखडले आहेत, मग ते म्हाडा, एसआरए किंवा 20 वर्षांपासून प्रलंबित असतील, त्यांना शासनाच्या अंगीकृत संस्थांच्या माध्यमातून टेकओवर करून पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करणार आहोत. तसेच जे लोक मुंबई आणि ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेले आहेत. बदलापूर किंवा नालासोपारा पर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये घर मिळावं, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.