मला तेवढंच काम नाहीय, संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढंच काम नाहीये”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी राऊतांवर पलटवार केला.

Eknath

उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. हा नवीन सिनेमा महाराष्ट्रात सुरु झाला आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढंच काम नाहीये”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी राऊतांवर पलटवार केला. (Eknath shinde gives answer of sanjay raut counter question)

हेही वाचा – शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० आमदारांसह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाविरोधात फारकत घेतली. अपक्षांसह ५० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी पदाची शपथ घेतली असली तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून याप्रकरणी सतत तोफ डागली जात आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच सरकार चालवत असल्याचं संजंय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“हे सरकारच बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. हा नवीन सिनेमा महाराष्ट्रात सुरु झाला आहे. या सिनेमाचा शेवट काय झाला होता हे आपण पाहिले असेल. सध्या सुरु असलेल्या सिनेमाचा राजकीय अंतसुद्धा त्याच पद्धतीने होईल. ही राजकीय आत्महत्याच आहे.” असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर काय?

“अरे बाबा, आता त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही. कारण रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढंच काम नाहीये”, असं शिंदे म्हणाले.

हेही वाचा – नगराध्यक्ष, सरपंचाची निवडणूक थेट झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय

• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय

• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय

• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.