शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी; आमदारांच्या अपात्रतेवरून संघर्षाची शक्यता

Eknath Shinde

मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक आज, सोमवारी होणार आहे. काल, रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात जिंकली. त्यामुळे आता आजच्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांची झालेली नियुक्ती रद्द ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड कायम ठेवण्याचा निर्णय नव्या अध्यक्षांनी घेतला. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेवरून शिवसेना -शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. पहिल्या दिवशी राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना 164 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली.

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांचा दणका, सेनेचे अधिकृत गटनेते एकनाथ शिंदे तर प्रतोद भरत गोगावले

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीची परीक्षा शिंदे सरकार उत्तीर्ण झाले असून आता सर्वांचे लक्ष आहे ते आजच्या फायनलकडे. कालची आकडेवारी ध्यानी घेता शिवसेना-भाजपा युती सरकारकडे 164 आमदारांचे पाठबळ आहे. शिवाय, आजारपणामुळे आजच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेले भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांचीही मते शिंदे सरकारच्या पारड्यातच राहतील.

तर, महाविकास आघाडीकडून राजन विचारे यांना काल 107 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे सात आणि काँग्रेसचे दोन आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही कारागृहात आहेत.

अपात्रतेचा वाद
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या 16 आमदारांनी राजन साळवी यांना, तर शिंदे गटाच्या 39 आमदारांनी नार्वेकर यांना मतदान केले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड कायम ठेवली. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीच्या वेळी हा संघर्ष शिगेला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकीचे शरद पवारांकडून संकेत,आमदारांना तयारी करण्याच्या सूचना