ठाकरेंच्या अडचणी वाढणार? शिंदे गटाकडून विधान परिषदेत नवी राजकीय खेळी

मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात खेळी करायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेतील ठाकरेंची कोंडी करण्याकरता शिंदे गटाने प्रतोद बदलण्याचा ठराव केला आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. शिंदे गटाने विधान परिषदेतील प्रतोदासाठी विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीतील निर्णय उपसभापतींना पत्राद्वारे कळवण्यात आला आहे.

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांचा दणका, सेनेचे अधिकृत गटनेते एकनाथ शिंदे तर प्रतोद भरत गोगावले

सुनील प्रभू यांच्याकडे शिवसेनेचे प्रतोदपद होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून कोणतीही कारवाई होऊ नये याकरता त्यांनी सुनील प्रभूंचं प्रतोदपद भरत गोगावले यांना दिले. तेव्हापासून विधानसभेत भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत. विधानसभेचा प्रतोद बदलल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत ठाकरेंची कोंडी करण्याकरता येथील प्रतोदही बदलला आहे. शिवसेनेचे गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची निवड केली आहे. या निवडीबाबत उपसभापतींना त्यांनी पत्र पाठवलं आहे. यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, विधान परिषदेतील प्रतोदपद बदलल्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका घेण्यास शिंदे गटाला मान्यता मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार

विधानसभेत ठाकरे गटाची सदस्यसंख्या कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. परंतु, विधान परिषदेत ठाकरे गटाचं वर्चस्व अधिक आहे. ठाकरे गटाचे आमदार सर्वाधिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विधान परिषदेत अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल स्पष्ट केलं. त्यांनंतर शिंदे गटाने हालचाली करत विधान परिषदेतील शिवसेनेचा प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे विधान परिषदेतही शिंदे गटाने बजावलेला व्हिप ठाकरे गटाला मान्य करावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभा ताब्यात घेतल्यानंतर आता विधान परिषद ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आणखी काय राजकीय खेळी करणार आणि त्यावर ठाकरे गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.