ठाकरेंचं धनुष्यबाण आता शिंदे गटाच्या प्रोफाईलवर; या नेत्यांनी बदलले फोटो

eknath shinde group leaders change their profile pictures

केंद्रीय निवडणूक आयोगााने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ठाकरेंशिवाय आता शिवसेना असणार आहे. मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची चलबिचल झाली आहे. मात्र आमचीच शिवसेना खरी म्हणणाऱ्या शिंदे गटाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. अशात आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचे आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल पिक्चरवर धनुष्यबाण हे चिन्ह ठेवलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला देताच, स्वत: एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चरवर धनुष्यबाणाचा फोटो ठेवला आहे. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे खासदार श्रीकांत शिंदे यांसह अनेक नेत्यांनी त्यांच्या ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरवर धनुष्यबाण चिन्ह ठेवलं आहे.

त्यामुळे शिंदे गटातील सर्वच नेत्यांच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलवर धनुष्यबाण चिन्ह दिसतं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील नेते, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण होतं. राज्यातील अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पेडे, मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला आहे. त्यांचा हा आनंद आता सोशल मीडियावरही दिसून येत आहे.


Weather Update : हाय गर्मी! फेब्रुवारीत सूर्य ओकणार आग; IMD दिला ‘हा’ इशारा