एकनाथ शिंदेंच्या फोननंतर शिवतीर्थावर बैठक, नितीन सरदेसाईंसह अनेक नेते उपस्थित

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. कालपासून दोनवेळा चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

mns chief raj thackeray tweet after eknath shinde take oath of maharashtra cm

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरणात नियमित बदल होत आहेत. राज्यात सत्ताबदल होणार की राजकारणाचा नवा अध्याय समोर येणार हे येत्या काळात समजेलच. दरम्यान, एकनाथ शिंदे (Sena rebel mla Eknath Shinde) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. कालपासून दोनवेळा चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. या फोननंतर काहीवेळापूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत.(Eknath Shinde had two phone conversations with Raj Thackeray, sparking political discussions)

हेही वाचा – बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात आज लढाई, दोन्ही बाजूंनी हायप्रोफाईल वकिलांची फौज तैनात

राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी सध्या राजकीय स्थितीबद्दल अद्यापही आपली भूमिका सांगितलेली नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी काल फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच, एनएआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोनवरून दोनदा चर्चा केली असून यावेळी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील अस्थिरतेवर आता एकनाथ शिंदे यांच्याबाजूने राज ठाकरे मैदानात उतरणार का याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.

या फोननंतर बंडखोर आमदारांचा गट मनसेमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, मनसेनेही तातडीने शिवतीर्थावर बैठक बोलावल्याने मनसेबाबतच्या वावड्यांना ऊत आला आहे. त्यामुळे, राज्यातील बदलत्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय निर्देश देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. आज, सोमवार संध्याकाळपर्यंत ५.३० वाजेपर्यंत मत मांडण्याची १६ बंडखोरांना (Sena Rebel Mla)  मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची कारवाई करताच रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करत नरहरी झिरवळ यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला आव्हान दिले. यामध्ये दोन स्वतंत्र याचिका असून त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ३७ बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.., शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मनसेचा पर्याय का, महत्त्वाची कारणे

  • दोन तृतीयांश आमदार एकत्र असल्याने त्यांना कोणत्यातरी पक्षात सामिल होणं गरजेचं आहे. तसेच, दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते असा नियम आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांनी मनसेमध्ये प्रवेश केला तर त्यांची आमदारकीही वाचेल आणि मनसेला आयती सत्ताही मिळेल.
  • राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचेच राजकीय संस्कार राज ठाकरे यांच्यावर आहेत. तसेच, राज ठाकरे आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत असतात. त्यांचा फोटोही लावतात. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावरून मते मिळवण्यासाठी राज ठाकरे चांगला पर्याय ठरू शकणार आहेत, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
  • आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातून निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरेंचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असू शकतात. मात्र, राज ठाकरे यांच्याबाबतीत अद्यापही तसे काही चित्र नाही. कारण अमित ठाकरे यांनी नुकतीच राजकारणात एन्ट्री घेतल्याने त्यांना राजकारणात आपले हातपाय पसरायला अद्याप वेळ लागू शकतो. त्यामुळे या पक्षात सामिल होणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षांतर्गत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित म्हणूनच बंडखोर आमदारांकडून मनसेचा विचार केला जात असेल.