घरताज्या घडामोडीगौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी बैठक घेणार, एकनाथ शिंदे यांची...

गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी बैठक घेणार, एकनाथ शिंदे यांची माहिती

Subscribe

मीरा भाईंदर येथील गौरव एनक्लेव को-ऑप. हौसिंग सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी रिकामी केल्यामुळे संबंधित विकासकाने येथील रहिवाशांना  करारानुसार नियमितपणे भाडे देणे आवश्यक आहे. ते भाडे मिळवून देण्यासाठी  विकासकाबरोबर बैठक घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील एनक्लेव सोसायटीचा पुनर्विकास रखडल्याबाबत आज विधानसभेत आमदार रवि राणा, गीता जैन यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर भागात गौरव एनक्लेव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची तळमजला अधिक ७ मजली इमारत १९९५ मध्ये बांधण्यात आली. ही इमारत धोकादायक ठरल्याने ती २०१३ मध्ये पाडण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर सीआरझेडचा भाग वगळून या इमारतीला २०१९ मध्ये २१ मजल्याची परवानगी महानगरपालिकेने दिली, मात्र या इमारतीसंदर्भात काही वाद उद्भवल्याने २०१९ मध्येच या इमारतीच्या बांधकामाची परवानगी रद्द केली. सदर विकासक उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यात स्थगिती दिली. ही स्थगिती आजही कायम आहे, असेही  एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या विकासकाने नगरविकास विभागाकडे अपील केले होते. वादग्रस्त सर्वे क्रमांक असतील ते बाजूला ठेवून नियमाप्रमाणे कागदपत्रे तपासून महानगरपालिकेने नगररचना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.यामुळे २३३ वंचित कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांनी विकासक आणि या इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घ्यावी आणि विकासकाकडून येथील रहिवाशी कुटुंबांना नियमितपणे घरभाडे मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत  देण्यात येतील,असेही  शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा : राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आणि कारवाई फक्त दरेकरांवरच?, प्रवीण दरेकरांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -