विधानसभा अध्यक्षांचा दणका, सेनेचे अधिकृत गटनेते एकनाथ शिंदे तर प्रतोद भरत गोगावले

Shinde group

शिवसेनेचे गटनेते व प्रतोद कोण यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर रविवारी रात्री उशीरा विधीमंडळाच्या सचिवांनी पडदा पाडला. उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी नियुक्त केलेले अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द ठरवली आहे. तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते तर भरत गोगावले हेच प्रतोद असणार असल्याचे पत्र सचिवांनी काढले. त्यामुळे सध्या शिवसेनेकडे असलेल्या 16 आमदारांना एकनाथ शिंदे यांनी काढलेला व्हीपचे पाळण करणे बंधनकारक ठरणार आहे.

VIDHAM BHAWAN

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. मात्र शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर त्याला आव्हान देत शिवसेनेच्या प्रतोदपदी असलेल्या सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करत त्या जागेवर भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. त्यातच खरी शिवसेना कोणती यावरून शिवसेना व शिंदे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना व शिंदे गटाने विधीमंडळाकडे पत्र दिले होते. त्यानुसार विधीमंडळ सचिवांनी रविवारी रात्री उशीरा अजय चौधरी यांची गटनेतेपदी व सुनील प्रभू यांची प्रतोदपदी असलेली नियुक्ती रद्द ठरवली. विधीमंडळ सचिवांचा हा निर्णय शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेचे 16 आमदारांना शिंदे गटाने काढलेला व्हीप मान्य करावा लागेल. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात या 16 आमदारांनी शिंदे गटाने काढलेला व्हीपचे पालन न केल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होते. याकडे सार्‍यांचे लक्ष लागलेले आहे. विधीमंडळाच्या सचिवांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा शिवसेनेकडे पर्याय उपलब्ध आहे.