एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोक मागे मतांच गणित

देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली आहे

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच जोर का धक्का दिला. पण त्याचबरोबर फडणवीस यांनी ते स्वत: मात्र सरकारमध्ये सहभागी नसतील पण सरकार चालवण्याची जबाबदारी मात्र माझी असेल असेही जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली आहे . यावर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३९ आमदार आणि इतर अपक्ष आमदार असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा बंडखोर आमदारांना परत घरी येण्याचे भावनिक आवाहन केले. पण शिंदेगट मात्र आपल्या भूमिकावर ठाम होता. या बंडामागे भाजपचा हात असल्याची बोलले जात होते. पण त्याबद्दल कधीही भाजपच्या नेत्यांनी जाहीर वाच्यता केली नव्हती. चंद्रकांत पाटील यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत वाद असून त्याचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी बघ्याची भमिका घेत मौनव्रतच धारण केले होते. तर शिंदे गटाने मविआचा पाठींबा काढत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात गेले. हीच संधी साधत त्यानंतर आठ दिवस शांत असलेला भाजपगट अचानक सक्रिय झाला. देवेंद्र फडवीस यांनी तातडीने राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आवाहन केले. यास आक्षेप घेत शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळली. यामुळे विधानसभेत जाऊन फ्लोर टेस्ट करतेवेळी होणारी नाचक्की टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत राजीनामा देत असल्याचे जाहीर. त्यानंतर रात्री उशीरा ठाकरे यांनी राजभवनात राज्यपालांकडे आपला राजीनामा सूपुर्द केला.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल असा कयास लावण्यात येत होता. शिंदेही गुवाहटी आणि गोवा करत आजच सकाळी मुंबईत आले. त्यानंतर १ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा सुरू झाली. पण नंतर आजच संध्याकाळी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी शिंदे आणि फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी भाजपला आमचा पाठींबा असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र राजकीय सूत्रे वेगाने हलली. फडणवीस हेच मुख्यमंत्री असणार यावर जणू शिक्कामोर्तब झाले. यामुळे पत्रकारांसह भाजप आणि शिंदे समर्थकांनी राजभवनात गर्दी केली.

पण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले.यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. तसेच आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकार चालवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ही भाजपचा मोठा डाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे हे नावापुरतेच मुख्यमंत्री राहून त्याचा संपूर्ण रिमोट मात्र फडणवीस यांच्याच हाती असणार हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचण्यासाठी शिवसेनेच्या नेत्याला मुख्यमंत्री करणार का असा सवाल केला होता. फडणवीस यांनी मारलेला हा मास्टरस्ट्रोक हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मारला असे आता स्पष्ट झाले आहे. तसेच  शिंदेगटाने केलेल्या गद्दारीमागे भाजप असल्याचे शिंदे यांच्या गुवाहाटीतील हॉटेलमधील व्हिडीओमुळे स्पष्ट झाले होते. यामुळे महाराष्ट्रात शिंदेबरोबरच  फडणवीस यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.  २०१९ साली शिवसेनेमुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेले होते. त्याच रागातून फडणवीस यांनीच शिंदेगटातील बंडाळीचा उपयोग करून ठाकरे सरकार पाडण्ायचा डाव रचल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावरही लोकांचा विशेषत मराठी माणसांचा राग आहे. महाराष्ट्रात राहून मराठी नागरिकांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. हे देखील शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यामागचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

तसेच एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार सातत्याने आपण अजूनही शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. परिणामी फडणवीस यांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे शिवसेनेची, शिंदे समर्थकांची मतेही आता भाजपच्या पारड्यात जाणार  हे निश्चित आहे. त्याचबरोबर बंडनाट्यामुळे  फडणवीसांची डागाळलेली प्रतिमाही या मास्टरस्ट्रोकमुळे उंचावली असून शिवसेनेला मात्र हा मोठा शह असल्याचे तज्त्रांचे मत आहे.