शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेणार; मुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही

Eknath Shinde

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सर्वात मोठा भगवा ध्वज फडकावण्यात आला.

यावेळी उपस्थितींना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, गेली अनेक वर्षे अनेक शिवभक्तांची एक मागणी, भावना होती की, या गडावर असलेले अतिक्रमण दूर झाले पाहिजे. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता बाळासाहेबांच्या विचारांचे आपले सरकार स्थापन झाले आहे. पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय झाला. पोलिस व प्रशासनाचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले, एकही कॅबिनेट अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

आज महाराष्ट्रातील गडांकडे पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे हे गडकोट उभे केले, काय तेव्हाचं इंजिनियरिंग, काय आर्किटेक्चर आणि काय परिस्थतीमध्ये एवढे मोठे किल्ले, गड उभं करण्याचं महापराक्रमी काम केलं, अशा या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि वंदन करतो. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावण झाली आहे. इथे आल्यावर अंगावर रोमांच शहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही. अशाप्रकारचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने साथीने घडवला. त्या काळची परिस्थिती आठवली तरी आजही अंगावर काटे उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. अशा या महापराक्रमी राजाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीत आपण आहोत. हे सर्वांच भाग्य आहे.

या कार्यक्रमाला येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा भगवा ध्वज फडकवण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं. आज येताना अनेक कार्यकर्ते, शिवभक्त रस्त्याने भेटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. विलक्षण आनंद होता. आपल्या महापराक्रमी राजाच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर आहे. इथली माती महाराजांचे शौर्य, पराक्रमाची साक्ष देते, असही शिंदे म्हणाले.

शिवरायांनी महाराष्ट्र घडवला. हे राष्ट्र घडवले. संपूर्ण जग शिवरायांकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते. गडांची बांधणी पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. गडाचे प्रवेशद्वार, पाण्याची साठवण, तोफा यांची भव्यता पाहून सध्याचे जग अजूनही किती मागे आहे, अशी भावना येते. ३६३ वर्षांपूर्वी अफझलखानाने महाराष्ट्रावर चालून येण्याचे धाडस केले. खानाने वार केल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर प्रतिवार करून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराजांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याला शांत बसता येणार नाही. तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागेल,” अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना

शिवाजी महाराज यांनी जलदुर्ग बांधले, आजही अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. शिवाजी महाराज यांना आरमाराचे जनक म्हटले पहिजे. हे किल्ले नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. मोदींनी नेव्हीच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर केला. आपण त्यांचे मावळे आहोत हे सांगायला अभिमान वाटतो. आपले गडकोट इतिहासाची साक्ष देणारे आहेत. दुर्ग प्राधिकरण स्थापन गडांचे संवर्धन करु, कोठेही पैसे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, तसेच अतिक्रमण हटवले जातील.अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.


ताईला सगळं माहितीय…; ‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीटमधून नक्की कोणावर केले आरोप?