मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबाबत केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. कुणाकडेही मुख्यमंत्रिपदू टीकू नये म्हणून कामाख्या देवीला कापले गेलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंगे वर्षा बंगल्याच्या परिसरात पुरण्यात आली, असा विधान संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला होता. याला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
त्यांना ( संजय राऊत ) यांना जादूटोणा करण्याचा जास्त अनुभव आहे. त्यामुळे त्यांनाच विचारा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या विधानावर जास्त बोलणे टाळले आहे.
हेही वाचा : पत्रकार परिषदेतून जाताना जरांगेंच्या ‘त्या’ आरोपांवर विचारताच मुंडे संतापले; म्हणाले, एकाला…
संजय राऊतांचा दावा काय?
“देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी का जात नाहीत, हा मारूती कांबळेचं काय झाले? यासारखा आमचा प्रश्न आहे. शपथविधी होऊन इतके महिने झाले, पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत? मी असे ऐकलंय की, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय, ‘राहायला गेलो, तरी वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी जाणार नाही.’ म्हणजे हा काय प्रकार आहे? अवघ्या महाराष्ट्राला याची काळजी लागली आहे,” असं राऊतांनी म्हटले होते.
“शिंदे गटात सगळे लिंबू-मिर्ची सम्राट आहेत. भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चा आहे की, ‘वर्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या बागेत खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत.’ आम्ही काय अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माननारे लोक आहोत. पण, कुणाकडेही मुख्यमंत्रिपदू टीकू नये म्हणून कामाख्या देवीला कापले गेलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंगे वर्षा बंगल्याच्या परिसरात पुरण्यात आली, अशी चर्चा तेथील कर्मचाऱ्यांमध्ये आहे,” असं राऊतांनी सांगितले होते.
मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही
राऊतांच्या विधानाबद्दल मंत्रालयात प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांना जादूटोण्याचा खूप जास्त अनुभव आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांना जास्त अनुभव असल्यामुळे, मला वाटते, तुम्ही त्यांनाच विचारा की, खरे काय आणि खोटे काय… यावर मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.”
हेही वाचा : ‘वर्षा बंगल्याच्या परिसरात रेड्याची शिंगे पुरली,’ राऊतांच्या दाव्यावर भुजबळांना हसू आवरेना, हात जोडला अन्…