नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

 

मुंबईः मागील 2 ते 3 दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह अचानक आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे ऐन कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकार्‍यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिक जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 2 दिवसांच्या अवकाळीने बागलाण, सटाणा, देवळा, मनमाड, त्र्यंबक आदी भागातील 191 गावांतील सुमारे 2600 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कापणीला आलेला गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष व इतर रब्बी पिके, फळबागा भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक भागात अजूनही ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकर्‍यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. त्या दृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बर्‍याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

अवकाळी पावसात सर्वाधिक 1 हजार 803 हेक्टवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 1 हजार 745 हेक्टर क्षेत्र निफाड तालुक्यातील, तर 58.30 हेक्टर क्षेत्र नाशिकमधील आहे. निफाडमधील 660, तर नाशिकमधील 117 अशा 777 हेक्टवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. नाशिकमधील 61.50 हेक्टरवरील कांद्याचीही पावसाने हानी केली आहे.

अधिवेशनात अवकाळी पावसाचा मुद्दा
चार दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याला सुरुवात होत आहे. राज्यात शनिवारी रात्रीपासून अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये जोरदार, तर जळगाव जिल्ह्यात हलका पाऊस झाल्याने रब्बीचे गहू, हरभरा पीक अडचणीत आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जाणार आहे.