घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंचे शिवसेनेला संघटनात्मक आव्हान; संघटना आणि चिन्ह ताब्यात घेण्याची खेळी

एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला संघटनात्मक आव्हान; संघटना आणि चिन्ह ताब्यात घेण्याची खेळी

Subscribe

आपला पक्ष हीच खरी शिवसेना संघटना आहे हे दाखवून देण्यासाठी शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटाचे ४० आमदार, अपक्ष आमदार यांची बैठक झाली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पदावरून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरे यांना संघटनात्मक आव्हान दिले आहे. शिंदे गटाने सोमवारी बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड केली. हे करताना शिवसेना पक्षप्रमुखपदाबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याशिवाय शिवसेनेची जुनी कार्यकारिणी रद्द करून नव्या नेमणुका करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. शिंदेंसह आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिशीवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आपला पक्ष हीच खरी शिवसेना संघटना आहे हे दाखवून देण्यासाठी शिंदे यांनी ही खेळी खेळल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटाचे ४० आमदार, अपक्ष आमदार यांची बैठक झाली.

- Advertisement -

या बैठकीत शिवसेनेचे लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार ऑनलाईन उपस्थित होते, असे कळते. शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात शिवसेना खासदारांना फोडण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेतून हकालपटटी करण्यात आलेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची  कार्यकारिणीत नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे कळते. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मात्र अशी कार्यकारिणी गठीत करण्यात आल्याच्या वृत्ताला स्पष्ट दुजोरा दिला नाही. दरम्यान, शिवसेनेचे १२ ते १४ खासदार मंगळवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे शिंदेगटातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीतच नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांना पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. काही तासांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नाहटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

खासदारही फुटणार

राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. या गटाचे लोकसभेत नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येईल. तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रामदास कदम,आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी

दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. रामदास कदम यांनी सकाळीच पत्र लिहून आपण शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, रामदास कदम यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर या पदाला कोणतीच किंमत राहिली नाही. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम कधीच झाले नाही.उलट मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम यांना सातत्याने अपमानित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी मला अचानक मातोश्रीला बोलावून आपण सांगितले की कोणी कितीही तुमच्यावर टीका केली तरी प्रत्युत्तर दयायचे नाही. तीन वर्षे मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. २०१९ साली आघाडी सरकार बनविताना देखील मी हात जोडून विनंती केली होती की बाळासाहेबांनी सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला. त्यांच्यासोबत युती करू नका. मात्र आपण त्याही वेळी माझे ऐकले नाही, अशी व्यथा कदम यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

शिंदे दिल्लीत दाखल

दरम्यान, दोन दिवसाच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत. ते मंगळवार दिवसभर दिल्लीत थांबणार असून ते रात्री उशिरा मुंबईत येणार आहेत.

एकनाथ शिंदेंना या खासदारांची साथ

राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, कृपाल तुमाने, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे आणि डॉ. श्रीकांत शिंदे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -