Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रEknath Shinde : माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

Eknath Shinde : माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे यांनी X या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट केली असून या माध्यमातून त्यांनी वर्षा निवासस्थानी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी एकत्रित येणाऱ्या समर्थकांना एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : राज्यात महायुती सरकारला महाविजय मिळविण्यात यश मिळाले आहे. 288 जागापैकी महायुतीने राज्यात तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मविआला यंदाच्या निवडणुकीत केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पण आता निवडणुकांचा निकाल येऊन तीन दिवस उलटलेले असतानाही महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे मात्र निश्चित होऊ शकलेले नाही. महायुतीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा भाजपा नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच कायम राहावे, अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीतील या पेचाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Eknath Shinde post appealing to Shiv Sena Shinde Group Party workers)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे, यासाठी सोमवारी (ता. 25 नोव्हेंबर) शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विजयाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण महायुतीतील मुख्यमंत्रिपदाबाबत देखील चर्चा केल्याचे बोलले जात आहे. त्याआधी निकालाच्याच दिवशी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद मिळावे, असे म्हटले. त्यानंतर नरेश म्हस्के व शिंदेंच्या अन्य नेत्यांकडूनही हेच विधान करण्यात येत आहे. तर सोमवारी शिंदे गटाचे काही पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद मिळावे, हे साकडे घालण्यासाठी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Politics : शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने…, ठाकरे गटाला आश्चर्य

एकीकडे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून आणि नेत्यांकडून शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे आता भाजपातील काही नेतेमंडळी त्यांच्या पक्षाकडे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली जावी, याकरिता आग्रही आहे. सावनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी तर देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यंमत्री व्हावे, अशी थेट मत व्यक्त केले. तर अन्य काही नेतेही हीच इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. जून 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा केली. त्यामुळे आता थेट बहुमत असताना सुद्धा महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा निर्णय घेण्यास उशीर का लागत आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटत नसल्याकारणामुळे अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आता वर्षा निवासस्थानी गर्दी करून शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देऊ लागले आहेत. पण अशातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी X या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट केली असून या माध्यमातून त्यांनी वर्षा निवासस्थानी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी एकत्रित येणाऱ्या समर्थकांना एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टद्वारे शिंदे आपल्या मित्रपक्षांवर दबाव तर टाकत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली पोस्ट राजकीय वर्तुळात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी (ता. 26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून याकरिता अनेक लाडक्या बहिणी त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.

काय आहे मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट?

“महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -