मुंबई : महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत काय होणार? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने कोणालाही मुख्यमंत्री केले तरी त्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेला पाठींबा असणार आहे. यावेळी त्यांनी अनेक बाबींकडे सर्वांचे लक्ष वेधले. “मुख्यमंत्री असलो तरीही मी नेहमी एक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.” असे म्हणत त्यांनी केलेल्या कामांचा आढावा सर्वांसमोर मांडला. (Eknath Shinde press conference about worked as chief minister and his stand)
हेही वाचा : Eknath Shinde : हा त्यांचा रडीचा डाव; ईव्हीएमच्या आरोपांवरून शिंदेंनी विरोधकांना सुनावले
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जसा विजय महायुतीला मिळाला, गेल्या अनेक वर्षात असा विजय कोणालाच मिळालेला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल जनतेचे आभार. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड आम्ही घातल्याने हा विजय झाला. हा जनतेचा विजय असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी प्रचंड काम केले आहे. लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो. माझी ही ओळख निर्माण झाली असून मी सर्वात मोठी ओळख मानतो.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
“गेल्या अडीच वर्षात मी पहाटेपर्यंत काम केले आहे. माझ्या अनेक सभा झाल्या असून दोन ते तीन तास झोपलो आहे. हे चक्र निवडणुकीदरम्यान चालूच होते. निवडणुकीच्या काळात मी 80 ते 90 सभा घेतल्या असून मी खूप प्रवास केला. अगदी पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही करत आहे. मी स्वतः ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी कॉमन मॅन म्हणून काम केले असून माझे हेच धोरण होते. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केले पाहिजे असेच सातत्याने वाटत होते.” असे म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.