ठाणे : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. दिल्लीतील भाजपाचे नेते महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तेबाबत जो कोणता निर्णय घेतील, तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल, असे स्पष्टपणे शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झालेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर केला. याचवेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या ईव्हीएम आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचे म्हटले आहे. (Eknath Shinde questioned the opposition on the allegations of EVM)
विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे, असा प्रश्न प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आला. याबाबत उत्तर देताना ईव्हीएमबाबत विरोधकांच्या आरोपांबाबत मी सांगतो असे म्हणत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा ते हरतात तेव्हा त्यांना हा घोटाळा वाटतो. झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होते का? कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता का? लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता का? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. तसेच, हरल्यावर विरोधक रडीचा डाव का खेळतात? असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला…
“मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी बोलणे केले. त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, ज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवाल तो मला आणि शिवसनेनेला मान्य असेल.” असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “महायुतीला जे यश मिळाले, तो विजय अविश्वसनीय आहे. महायुतीने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. हा सर्व जनतेचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी काम केले आहे. मीही पायाला भिंगरी लावून एका सध्या कार्यकर्त्याना म्हणून काम करतो, मी मुख्यमंत्री स्वतः ला कधीच समजलो नाही. मी स्वतः ला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच राहत होते. मी अडीच वर्षाच्या काळात जे काही काम केले, त्यामध्ये मी समाधानी आहे. महायुतीमध्ये भाजपानेही मला चांगले सहकार्य केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी, अमीत शहा यांना धन्यवाद देईल. त्यांच्या सहकार्यामुळे राज्याचा विकासदेखील चांगला झाला. गेल्या अडीच वर्षात अनेकांचे प्रश्न सोडवले. मग ते शेतकरी असो, बेरोजगार असो, किंवा सर्वसामान्य असो.” अशा भावना शिंदेंनी व्यक्त केल्या.