महाराष्ट्रातील तमाम मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विधानसभा निवडणुकीत महायुतील बहुमत मिळेल, असं मी अगोदरपासून सांगत होतो. लाडक्या बहिणी आणि भावांनी, शेतकऱ्यांनी, जेष्ठांनी महायुतीला मतदान केलं. त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र समोर आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महायुतीनं दोन वर्षात केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली आहे. अडीच वर्षात जे काम केले. तेच पुढील कार्यकाळात आम्ही करू. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असं मी अगोदरपासून सांगत होतो. लाडक्या बहिणी, भावांनी, शेतकऱ्यांनी, जेष्ठांनी महायुतीला मतदान केलं.”
ज्याला जास्त जागा, त्याला मुख्यमंत्रिपद मिळणार, असं भाजपकडून बोललं जात आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं, “आमच्या याबद्दल बोलणं झालं नाही. सगळी आकडेवारी आल्यानंतर तीनही पक्ष एकत्र बसू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ.”
“अडीच वर्षे फक्त टीका-टिप्पणी करण्यात गेली. आतातरी एक स्वत:कडे पाहिलं पाहिजे. आम्ही आरोपांचं उत्तर आरोपांनी नाहीतर कामानं दिलं,” असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.