शिंदे गटाच्या बंडाळीमुळेच बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला, एकनाथ खडसेंचा दावा

Eknath Khadse

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपला धक्का दिला आहे. भाजपकडून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाला धोका असल्याचं लक्षात आल्यानंतर बंडाळी होण्यापूर्वीच नितीश कुमार यांनी एक घाव दोन तुकडे केले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील पहायला मिळाली होती. मात्र, चाणाक्य असलेल्या नितीश कुमार यांनी खोडाच्या मुळावरच कुऱ्हाड चालवली. दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीमुळेच बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला रामराम ठोकत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल यांच्या पक्षाशी युती केली. भाजपा केंद्रात आल्यानंतर त्यांच्या सोबत अनेक मित्रपक्ष देखील होते. पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रातून शिवसेना भाजपासोबत होते. मात्र, हळूहळू सर्व पक्ष भाजपापासून दूर गेले. नितीश कुमार हे फक्त भाजपसोबत होते. मात्र, आपल्याविरोधात कट रचला जातोय, अशी कुणकुण लागताच नितीश कुमार भाजपमधून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी आजची परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

काल दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू असतानाच बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला. बिहारचे पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले आणि सहावेळा खासदार राहिलेले नितीशकुमार हे राष्ट्रीय पातळीवरील एक मुरब्बी नेते समजले जातात. एनडीएमधील घटक असलेल्या एका मोठ्या पक्षाचे नेते होते. पंतप्रधान होण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. या अगोदर त्यांची काँग्रेसशी जवळीक होती. मात्र नितीशकुमार यांचा स्वभाव काहीसा शीघ्रकोपी असल्याने त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी फार काळ जमत नाही हा इतिहास आहे. भाजपचं बिहारमध्ये ऑपरेशन लोटस सुरू असतानाच नितीश कुमारांनी हे लोटस हाणून पाडलं आहे.


हेही वाचा : शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या मंत्र्यांना पडला बाळासाहेबांचा विसर