महाराष्ट्राचा तक्ख्तापालट करण्याचा प्लान आठ महिन्यांपूर्वीच ठरला होता

फोडाफोडीचा प्लान आठ महिन्यांपूर्वीच आखण्यात आला होता असा गौप्यस्फोट जळगावमधील शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सांवत यांनी केला आहे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून मविआ सरकार अस्थिर झाले आहे. शिंदे सारख्या विश्वासू नेत्याने पक्षाविरोधात बंड पुकारल्याने उद्धव ठाकरेच नाही तर तमाम शिवसैनिकांना जबर धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याने शिवसेना खिळखिळी झाली आहे. तर एवढ्या मोठ्या बंडाची कुठलीही पूर्वसूचना कशी ठाकरे गटाला मिळाली नाही याबद्दल सामान्यांना प्रश्न पडला आहे. तर दुसरीकडे या फोडाफोडीचा प्लान आठ महिन्यांपूर्वीच आखण्यात आला होता असा गौप्यस्फोट जळगावमधील शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सांवत यांनी केला आहे. सावंत यांच्या या खुलाशामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बंडखोरांना परत येण्याची भावनिक साद उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा दिली. पण शिंदेच्या या सत्तासंघर्षात भाजप सामील असल्याचे स्पष्ट झाल्याने शिंदेगटाच्या परतीच्या आशा आता मावळल्या आहेत. यामुळे ठाकरे सरकार जाणार हे निश्चित आहे. यामुळे राज्यभरात शिवसेनेचे नेते सक्रीय झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर जळगावात पत्रकार परिषदेत बोलताना संजय सावंत यांनी बंडावर भाष्य केलं. ते म्हणाले कि शिवसेनेत बंड होणार याची कल्पना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी ८ महिन्यांपूर्वीच दिली होती. तसेच एक मोठा मंत्री ही फोडाफोड करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले होते. पण पाटलांनी आतापर्यंत अनेक मोठी काम केली पण त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली. हेच गद्दार शिंदेच्या गळाला लागले . पण शिवसेना या गुलाबराव पाटीलांना धडा शिकवणारच असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला.

तसेच सध्यस्थितीवर बोलताना त्यांनी शिवसैनिक गोंधळल्याचे सांगितले. नक्की कोणाची बाजू घ्यायची हेच त्यांना कळत नव्हते. पण आता शिवसेना उद्धव ठाकरेंची असल्याचे त्यांना कळाले असून पळून गेलेले गद्दार आहेत. असेही सावंत म्हणाले आहेत. तसेच बंडखोर शिवसैनिकांना त्यांच्या मतदारसंघात जिंकू न देण्याचाही इशारा सावंत यानी दिला.