एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

eknath shinde

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिंदेंविरोधात पक्षाने ही मोठी कारवाई केली आहे.

उद्धव ठाकरेंनी चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ठाकरे यांनी केली आहे. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हटविले आहे.

शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आपल्यासोबत असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटानं केला होता. शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंविरोधात मोठी कारवाई केली असून पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.


हेही वाचा : तुम्ही राजीनामा द्या आणि.., केसरकरांचं संजय राऊतांना आव्हान