हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सुरू केलेल्या नव्या पर्वात अब्दुल सत्तारदेखील आमच्यासोबत – एकनाथ शिंदे

केवळ हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आमदारांनी वेगळी वाट निवडली होती. मात्र, हिंदुत्व जोपासत असताना इतर समाजाबद्दल द्वेष ही भावा मुळीच नाही, असे हिंदुत्व तर बाळासाहेब ठाकरे यांनाही मान्य नव्हते. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सुरु केलेल्या नव्या पर्वात अब्दुल सत्तार देखील आमच्यासोबत आहेत. हेच खरे हिंदुत्व असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचे कौतुक केले.

बाळासाहेबांचे विचार हिंदुत्ववादी होते पण कुणाला त्रास द्यायचा हा त्यांचा उद्देश नव्हता. अनेक पदाधिकरी, कार्यकर्ते  इतर समाजाचे राहिले आहेत. त्यामुळेच आमच्यासोबत ही अब्दुल सत्तार यांच्या सारखे नेतृत्व आहे. इतर समाजातील बांधवांचाही आदर करणे महत्वाचे आहे. सगळ्या धर्माचा आदर करत पुढे जाणे याच शिकवणीचे पालन करत आता मार्गक्रमण सुरु आहे. त्यामुळे आपला मार्गही सुखकर होणार आहे आणि त्यामधून उद्देशही साध्य केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

मुस्लिम समाजाला एफएसआय वाढवून  दिले –

यापूर्वी मुस्लिम समाज बांधव हे रस्त्यावर नमाज पाडत होते. ही बाब बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांना नमाज पाडण्याासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. वेळप्रसंगी मशिदींचे एफएसआय वाढवून दिले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याच विचाराने आपण मार्गक्रमण करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मेळावा अब्दुल सत्तार यांनी आयोजित केला असला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचे हिंदुत्व हेच मुद्दे शिंदे यांनी अधिरोखित केले आहेत.