महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? यावरून सगळं घोड अडलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री करा, दुसरे तीन खात्यांची मागणी केली आहे. तिसरा म्हणजे खात्यांबाबत निर्णय घेतला नाहीतर बाहेरून पाठिंबा देऊन, असं शिंदेंनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. त्यामुळे भाजपसमोरही पेच निर्माण झाला आहे.
गुरूवारी गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्रिपद का दिले पाहिजे, याबाबत अमित शहा यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.
हेही वाचा : “आमचं निस्तरायला आमचा आमचा साहेब घट्ट हाय”, बंटी पाटलांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात लागले बॅनर्स
एका इंग्रजी वृत्तपत्राला शिंदे सेनेच्या जेष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे अमित शाहांना म्हणाले की, “विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढण्यात आल्यानं महिला, मराठा आणि ओबीसी मतदारांनी महायुतीला पदरात कौल टाकला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन या अपेक्षेने जनतेने मतदान केले आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री न केल्यास समाजातील घटकांत चुकीचा संदेश जाईल.”
यावेळी एकनाथ शिंदे यांनी काही सर्वे अमित शाहांना दाखवले, ज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना पसंती आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास समतोल राखण्यासाठी गृह, अर्थ आणि महसूल खाते देण्यात यावे. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ,” असं एकनाथ शिंदे अमित शाहांना सांगितलं.
“ही तीन खाती शिवसेनेला दिले नाहीतर सरकारमध्ये सहभागी होणार नाही. शिवसेना राज्य सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. पक्षाचे खासदार सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सरकारला हिंदुत्त्वासाठी बाहेरून पाठिंबा देतील,” असं एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांना म्हटलं.
दरम्यान, महायुतीच्या तीनही नेत्यांना मुंबईत बैठक करण्यास सांगितली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याकडे यावे, असे निर्देश अमित शहा यांनी दिले आहेत.
हेही वाचा : ‘ते’ पराभव नाना पटोलेंच्या जिव्हारी; ठाकरे अन् ‘तुतारी’मुळे नुकसान झाल्याचं केलं मान्य