घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंनी फाईली थांबवल्या, भेटीसाठी ताटकळत ठेवले- एकनाथ शिंदेच्या नाराजीची कारणे

उद्धव ठाकरेंनी फाईली थांबवल्या, भेटीसाठी ताटकळत ठेवले- एकनाथ शिंदेच्या नाराजीची कारणे

Subscribe

शिवसेनेचे एकनिष्ठ नेते असलेल्या एकनाथ शिंदेवर ही वेळच का आली? यावर राजकीय वर्तुळातच नाही तर सामान्यजनांमध्येही उत्सुकता आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून सरकार अस्थिर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शिंदे ३५ हून अधिक आमदारांसोबत सूरतमधील हॉटेलात मुक्कामी असून ठाकरे सरकार त्यांची मनधरणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण असे असताना शिवसेनेचे एकनिष्ठ नेते असलेल्या एकनाथ शिंदेवर ही वेळच का आली? यावर राजकीय वर्तुळातच नाही तर सामान्यजनांमध्येही उत्सुकता आहे.

मविआ नेत्यांच्या मते ईडीच्या भीतीमुळे शिंदे यांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे. तर भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे सरकारकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळाल्यानेच शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. जाणकारांच्या मते शिंदेंनी काही एका रात्रीत घडलेल्या घटनांमुळे हे बंड पुकारले नसून त्यामागे अनेक कारणे दडली आहेत. याचपार्श्वभूमीवर या बंडखोरीच्या नाटकाची पटकथा राज्यसभा निवडणुकीआधीच लिहीण्यात आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

वर्षानुवर्ष शिवसेनेचा गड समजला जाणारा ठाणे जिल्हा राखण्यात एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. यामुळे शिंदे यांचा फक्त ठाण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही दबदबा आहे. रात्र असो दिवस असो की ऊन वारा पाऊस शिंदे कधीही जनतेच्या सेवेसाठी तप्तर असतात. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मितभाषी असलेले शिंदे सामान्यजणांमध्ये जाऊन त्यांची विचारपूस करतात. कधी कोरोना वार्डात पीपीई किट घालून रुग्णांची विचारपूस तर कधी पूराच्या कंबरभर पाण्यात उतरुन
पूरग्रस्तांना योग्य मदत मिळते की नाही हे ते जातीने बघताना सगळ्या महाराष्ट्राने बघितले आहे.

यामुळे आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिंदे हाच शिवसेनेचा एकमेव विश्वासक चेहरा म्हणून ओळखला जातोय. पण एवढे सगळे असूनही वर्षभरापासून शिंदे यांच्यात पक्षश्रेष्ठींकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली होती. त्याला कारणही तशीच घडली . शिंदे यांच्या अनेक निर्णय आणि सूचना उद्धव ठाकरेंकडून दुर्लक्षिले जात होत्या. एवढेच नव्हे तर विकाससंदर्भातील काही शासकीय फाईली सचिवांमार्फत थांबवल्या गेल्या. त्याचबरोबर ज्या हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेला जनतेने निवडून दिले होते तो मुद्दाही ठाकरेंकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षला जात होता. शिंदे यांना हीच गोष्ट सातत्याने खटकत होती. त्यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. पण अनेकवेळा त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासनतास ताटकळत ठेवले जात होते. शिंदे हे राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेते असतानाही त्यांना ठाकरेंकडून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. यामुळे ठाकरेंच्या या वर्तणुकीमुळे दुखावलेल्या आणि नाराज झालेल्या शिंदे यांच्या मनात पक्षातून बाहेर पडण्याचा विचार येऊ लागला होता.

- Advertisement -

शिंदे फडणवीस यांच्या मैत्रीवर ठाकरेंची नाराजी

महाराष्ट्रात जेव्हा भाजप शिवसेनेची युती होती तेव्हाही शिंदे मंत्री होते. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी एक्सप्रेसनिमित्त या दोन नेत्यांची मैत्री झाली. शिंदे यांची फडणवीसांबरोबरची जवळीक उद्धव ठाकरे यांना खटकू लागली. त्यातच भाजपकडून सातत्याने मविआमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने ठाकरे सरकार भाजप विरोधी मुद््यांच्या शोधातच होते. याचदरम्यान फडणवीस यांच्या समृद्धी एक्सप्रेस योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भातील काही दस्तावेज ठाकरे सरकारच्या हाती लागले. भाजपवर कुरघोडी करायची आलेली ही संधी ठाकरेंना सोडायची नव्हती. त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदेमार्फत हा पर्दाफाश करण्याच्या विचारात होती. पण फडणवीसांबरोबच त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेले शिंदेही यात अडकले असते. यामुळे शिंदेनी त्यास नकार दिला. त्यानंतर शिवेसेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदेविरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.

तर दुसरीकडे नगरविकासमंत्री असल्याने शिंदे यांनी मुंबईचा डीपीआर तयार करताना शहर विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यास मुख्यमंत्री विभागाकडून रेड सिग्नल देण्यात आला आणि त्या योजना बासनात अडकून पडल्या. यामुळे शिंदे नाराज झाले. तसेच शिंदे यांना ठाणे, रायगड,आणि पालघरसह काही जिल्ह्ायंमध्ये
आयएएस आणि डेप्युटी कलेक्टरची नियुक्त्या करायच्या होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी त्या होऊ दिल्या नाहीत. तसेच विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे क्रमांक एकचे राजकीय नेते असतानाही त्यांना डावलून युवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्व दिले गेले. यामुळे शिंदे यांच्या हे जिव्हारी लागले असून ते भाजपच्या वाटेवर निघाले आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -