राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर ‘शिवतीर्था’वर भेटीसाठी रिघ, आमदार सदा सरवणकरांनी घेतली सदिच्छा भेट

शस्रक्रियेनंतर राज ठाकरे यांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधलेला नाही. मात्र सोशल मीडियाद्वारे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले

Eknath Shinde supporter MLA Sada Sarvankar meet MNS president Raj Thackeray begins after major surgery at Shivtirtha

महाराष्ट्रात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 41 हून अधिक आमादारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सत्ता पालट पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून पाय उतार होत, त्यांच्या जागी एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यात आता शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. याच काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. यामुळे राज ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींपासून गेले काही दिवस प्रत्यक्ष अलिप्त होते. मात्र सोशल मीडियावर ते प्रत्येक घटनेवर आपल्या शैलीत व्यक्त होत राहिले. मात्र आता राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर काहीसे पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर शिवतीर्थावर त्यांना भेटीसाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांची विचारपूस करण्यास राज्यातील चालू घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सदा सरवणकर हे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंना राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

शस्रक्रियेनंतर राज ठाकरे यांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधलेला नाही. मात्र सोशल मीडियाद्वारे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तरी बेसावध राहू नका असा सल्ला दिला होता. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, आपले अभिनंदन, खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन!

राज ठाकरेंकडून फडणवीसांचे तोंडभरून कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा देत त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे, त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधई मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, अशा शब्दात राज ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.


शरद पवारांची भेट घेतल्याची अफवा, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खुलासा