एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार? महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा

एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता असून सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्या आठवड्याभरापासून गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. ३७ आमदारांनी महाविकास आघाडीतून पाठिंबा काढून टाकला असल्याचा दावा शिंदेंकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. दरम्यान, १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदार पुढे काय रणनीती आखणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता असून सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde to arrive in Mumbai today? Mahavikas Aghadi government’s ordeal)

हेही वाचाचार दिवसांत २८० जीआर मंजूर कसे केले? राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवला सविस्तर अहवाल

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. ज्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आहे असे विधानसभेचे उपाध्यक्ष निर्णय कसे काय घेऊ शकतात असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारत पुढील सुनावणी १२ जुलै रोजी ठेवली आहे. दरम्यान, १२ जुलैपर्यंत महाविकास आघाडीला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा – राज्यात लवकरच फ्लोअर टेस्टची शक्यता, सत्ता स्थापनेसाठी भाजपची शिंदे गटासोबत तयारी सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात विश्वासदर्शक ठरावावर कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता विश्वासदर्शक ठरावाचा पर्याय खुला झाला आहे. त्यामुळे राज्यपालांकडे शिंदे गटाने पाठिंबा काढल्याचे पत्र दिल्यानंतर पुढील सत्तासंघर्षाचा अंक सुरू होणार आहे. पाठिंबा काढल्याचे पत्र मिळाल्यानंतर राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून दोनदा पवारांनी रोखले

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत ते पुढील रणनीती आखू शकतात. १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून कोर्टाकडून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने एकनाथ शिंदेच्या गटातून हालचाली वाढल्या आहेत. तर, दुसरीकडे भाजपकडूनही जय्यत तयारी सुरू असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यास त्यांच्यासमोर खूप मोठा पेच निर्माण होऊ शकतो. यातून सरकार कोसळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करता आले नाही तर एकनाथ शिंदे गट पर्यायी पक्षाचा आधार घेऊन सत्ता स्थापन करू शकते, असा दावा करण्यात येत आहे.