प्रिय शिवसैनिकांनो नीट समजून घ्या.मविआचा खेळ ओळखा–एकनाथ शिंदे यांचे टि्वट

एकनाथ शिंदे यांनी टि्वट केले असून शिवसैनिकांना मविआचा खेळ ओळखण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रच नाही तर देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून आज संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्रात जागोजागी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचे पुतळे जाळत दगडफेक केली. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी टि्वट केले असून शिवसैनिकांना मविआचा खेळ ओळखण्याचे आवाहन केले आहे.

शिंदे यांच्या बंडखोरींमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदे यांच्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याने ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार हे निश्चित आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निवासस्थान सोडून मातोश्रीत परतले आहेत. त्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांसह शिवसैनिकांनाही भावनिक आवाहन केले. त्यानंतर भावूक झालेल्या शिवसैनिकांनीही शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हा सर्व गोंधळ एकीकडे सुरू असतानाच शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव यापुढे शिवसेना बाळासाहेब असेल असे जाहीर केले. त्यावरून वातावरण अधिकच पेटले असून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद रंगला आहे. बाळासाहेबांचे नाव वापरून वेगळा गट निर्माण करण्याचा शिंदेगटाच्या निर्णयाला महाराष्ट्रातून विरोध होत आहे. यातूनच आज ठाणे, रायगड, पालघर कोल्हापूर यासह विविध जिल्ह्यांमध्ये संतप्त शिवसैनिकांनी बंडखोरांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोडही केली. पुतळेही जाळले. यात शिंदे यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला.

यामुळे महाराष्ट्रात शिंदेगटाला होणार वाढता विरोध बघता शिंदे यांनी टि्वट केले आहे. यात त्यांनी शिवसैनिकांना नीट समजून घ्या. मविआचा खेळ ओळखा. मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.