घरमहाराष्ट्रघर का भेदी लंका ढाए...महाराष्ट्रातील राजकारणातला खरा भेदी कोण?

घर का भेदी लंका ढाए…महाराष्ट्रातील राजकारणातला खरा भेदी कोण?

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मविआ सरकारलाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला जबर धक्का बसला आहे.

ज्या कट्टर शिवसैनिकाने , शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, नगरविकासमंत्री असा चढत्या क्रमाचा राजकीय पल्ला गाठला. शिवसेनेबरोबर चार दशकाहून अधिक काळ इमाने इतबारे राहत ठाण्यात शिवसेनेचा गड राखला असा सच्चा शिवसैनिक असलेले  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मविआ सरकारलाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला जबर धक्का बसला आहे. या धक्क्यातून महाराष्ट्रातील जनतेला सावरायला किती वेळ लागणार हे सध्या सांगणे जरी कठीण असलं तरी ठाकरे सरकारला यातून नक्कीच मोठा धडा शिकायला मिळाला आहे. जे सरकार पाडण्यासाठी भाजपचे मातब्बर विरोधी नेते देवेंद्र फडणवीस २०१९ पासून रात्रीचा दिवस करत होते , नाना क्लृप्त्या करून ज्यांनी गाडलेले मुडदे उकरून काढत म्हणजेच जुनी भ्रष्टाचाराची, गुन्हेगारीची प्रकरणे हुडकून काढत मविआमधील नेत्यांना सळो की पळो करून सोडले पण तरीही त्यांना सरकारला साधा धक्काही लावता आला नाही. पण तेच एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत करुन दाखवले आहे. यामुळे घर का भेदी लंका ढाए ..हा वाकप्रचार  महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अगदीच चपखल बसला आहे.

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशीरा मविआबरोबर बंडखोरी करत ३५ हून अधिक आमदारांसह गुजरात गाठले. शिंदे यांच्या या अॅक्शनमुळे हादरलेल्या ठाकरे सरकारने त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांचे विश्वासू रविंद्र फाटक यांना सूरतमध्ये पाठवले. तेथे नार्वेकर यांनी शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच उध्दव ठाकरे आणि शिंदे यांचे फोनवर बोलणेही करून दिले. शिंदे हे शिवसेनेशी इमान राखणारे नेते असल्याने त्यांची नाराजी चर्चा करुन दूर करता येईल असा विश्वास खुद्द उद्धव ठाकरेना होता. मात्र ‘भाजपबरोबर या’ अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याने ठाकरे यांसह राज्यातील जनतेला धक्का बसला. यावर तुम्ही या मग बोलू असेही ठाकरे यांनी शिंदेना सांगितले. पण शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी शिंदे यांचा कल काय आहे हे सगळ्या राज्याला कळाले. त्यानंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकूण सद्यस्थिती बघता शिंदे यांच्याकडे ३५ हून अधिक आमदार असल्याने त्यांचे पारडे जड आहे. यामुळे सरकार अस्थिर झाले आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी उलाढाल सुरू असताना ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नेहमी तत्पर असलेले देवेंद्र फडणवीस मात्र कमालीची शांतता बळगून आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. तरी त्यांना जे अनेक उलाढाल्या करूनही जमले नाही ते शिवसेनेच्याच शिवसैनिकाने करून दाखवले असून आज आपल्या स्वत:च्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याचे श्रेय अर्थातच फडणवीस यांना न जाता यावेळी एकनाथ शिंदेकडे जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ साली पहाटे झालेल्या अभूतपूर्व शपथविधी कार्यक्रमाने भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा आणला तो कायमचा. तसेच त्या शपथविधी कार्यक्रमात फडणवीसांची अजित पवारांनी जी फजिती केली ती सर्वश्रूत आहे. पण याच फजितीमुळे भाजपमध्ये अधिक जर कोणी दुखावले गेले असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. याच भावनेतून फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येईन असे सांगत विश्वास व्यक्त केला होता. तेव्हापासून फडणवीस यांनी मविआविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. यातूनच भाजप नेत्यांकडून मविआ सरकारमधील प्रामुख्याने शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. यात प्रामुख्याने या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला असून त्यात शिवसेनेचे अनिल परब, मुंबई महापालिकेचे स्थाय़ी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव, प्रताप सरनाईक,  यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आहेत. तर यातील काहींमागे ईडीची पिडाही लागली आहे. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हाच मुद्दा पकडून फडणवीस सतत ठाकरे सरकारला लक्ष्य करत आले आहेत. त्यातच कोवीड काळातही मविआतील नेत्यांनी जम्बो सेंटर मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला गेला. तर भाजपचे नेते किरीट सोम्मया कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यांच्या अलिबाग येथील जमिनीत गैरप्रकार केल्याचाही आरोप करताना दिसले. सोमय्या तर परबांचे दापोलीतील रिसोर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहचले होते. यामुळे सत्तेतील नेते कसे भ्रष्टाचारी आहेत हे जनतेला दाखवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये चुरुसच सुरू असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.  तर कधी बॉलीवूड दिवंगत स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे राजकारण करत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे करताना दिसतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांनी केंद्रीय चौकशी यंत्रणा असलेल्या ईडी, सीबीआय, ईनकम टॅक्स, एनसीबी यांचा वापर करुन सेनेच्या डझनभर नेत्यांच्या मागे ससेमिरा लावूनही सरकार कोसळत नसल्याने भाजप नेत्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून रोज नवीन खेला खेलला जात आहे.

या खेल्याची सूत्र मात्र फडणवीस आणि अमित शहांकडे आहेत. पण तरीही ठाकरे सरकारला जराही धक्का बसत नसल्याने फडणवीसांसह शहा देखील वैतागले होते. काहीही करुन सरकार पाडायचेच असा विडाच भाजपने उचलला आहे.

- Advertisement -

त्यातच आता मविआ सरकारमधील पक्षांतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागल्याने भाजपला आयतेच फावले . एकीकडे ईडीचे शस्त्र आणि दुसरीकडे नाराज नेते यांची मोट बांधत शेवटचा डाव भाजपने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून खेळला. शेवटी जे घर फोडणे बाहेरच्यांना जमले नाही ते घरातील व्यक्तीनेच फोडले आणि बाळासाहेबांची शिवसेना आज चक्रव्यूहात सापडली.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -