नवी दिल्ली : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या विधानसभेच्या निकालात राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा बहुमताने आले आहे. महायुतीत सर्वात जास्त जागा या भारतीय जनता पक्षाच्या आल्या असून सध्या राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री साडेदहा ते 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे. पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीचे फोटो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत, मात्र अद्याप एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोशल मिडियावर एकही फोटो शेअर केला नाही आहे. त्यामुळे सर्वत्र याविषयी चर्चा रंगली आहे. (Why Eknath Shinde not share photos with amit shah on twitter facebook social media like Devendra fadnavis and ajit pawar.)
सध्या राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात दिसून आले आहेत. तसेच यावेळी फडणवीसांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्य बरेच काही सांगून जात होते. अजित पवार यांचा चेहरादेखील उत्साहाने ओसंडून वाहत होता. मात्र सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. तसेच फडणवीस आणि अजित पवारांनी या बैठकीचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत पण शिंदेंनी या बैठकीचा एकही फोटो शेअर केला नाही आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : विधानसभेचे निकाल मान्य नसले तरी…; मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले राऊत?
एरवी एकनाथ शिंदे त्यांचा कार्यक्रम, सभा आणि गाठीभेटींचे फोटो लगेच सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. या गोष्टीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar