अग्निपरीक्षेनंतर एकनाथ शिंदे करणार बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन

आज बहुमत चाचणी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.

गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक आज, सोमवारी होणार आहे. काल, रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात जिंकली. त्यामुळे आता आजच्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांची झालेली नियुक्ती रद्द ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड कायम ठेवण्याचा निर्णय नव्या अध्यक्षांनी घेतला. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेवरून शिवसेना -शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आज बहुमत चाचणी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. (Eknath Shinde will greet the memorial of Balasaheb Thackeray today)

हेही वाचा – शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी; आमदारांच्या अपात्रतेवरून संघर्षाची शक्यता

बहुमत चाचणी झाल्यानंतर एकनाथ शिंदे विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवनात पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. त्यानंतर ते हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील.

तेथून ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, ते आज चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत.

हेही वाचा -गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना ठाण्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ते ठाण्याच्या दिशेनेही जाणार आहेत. ठाणे आणि मुंबई जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर (आंनद नगर चेक नाका) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व जल्लोषात ठाण्यात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिंदे गटाचे समर्थक शक्तीप्रदर्शन करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचेही दर्शन घेतील. यानंतर ते टेम्भी नाका येथील आनंदाश्रम येथे भेट देऊन पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.