मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सुरतमार्गे गुवाहाटीला गाठले होते. यानंतर महाराष्ट्रात परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे म्हटले होते की, माझ्यासोबत आलेला एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेन. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला आलेल्या काही आमदारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राजकारणातून निवृत्ती घेणार का? हे पाहावे लागेल. (Eknath Shinde will retire from politics after 5 MLAs who came to Guwahati are defeated)
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदार पालघर मार्ग आधी सुरतला गेले आणि त्यानंतर गुवाहाटीला. गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी मुक्काम होता. महाराष्ट्रात परत आल्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, तसेच त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून घालवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली असा संदेश लोकांमध्ये गेला. उद्धव ठाकरे हे आपल्या प्रत्येक सभेमध्ये पक्ष चोरला म्हणून बोलताना दिसतात. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे. या सर्व गोष्टींमुळे शिंदेसोबत असलेल्या आमदारांचाही आत्मविश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण झाला होता. अशावेळी शिंदेंनी एक घोषणा केली होती.
हेही वाचा – Sharad Pawar : आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने जनतेसमोर जाणार; पवारांचा निर्धार
एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे म्हटले होते की, माझ्यासोबत आलेला एकही आमदार पडणार नाही. सर्व निवडून येतील याची जबाबदारी मी घेतो. यापैकी एखादाही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेने आणि गावी शेती करायला जाईन. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याची तेव्हा चर्चा झाली होती. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही एकनाथ शिंदेंना त्यांच्या वक्तव्याची जाणीव करून दिली होती. दरम्यान, समोर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात बंडखोरी करून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 40 पैकी पाच आमदारांचा पराभव झाल्याचे समोर येत आहे.
शिंदेंसोबत गेलेल्या पाच आमदारांचा पराभव
दरम्यान, काय झाडी, काय डोंगर या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे. याशिवाय मुंबईतील चर्चेत असलेल्या माहिमच्या जागेवर सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या ठिकाणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेकडून, तर ठाकरे गटाचे महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठिकाणी महेश सावंत विजयी झाल्यामुळे सदा सरवणकर यांना पराभवाचा धक्का बसला. याशिवाय मुंबईतून यामिनी जाधव, विदर्भातून संजय रायमुलकर आणि मराठवाड्यातून ज्ञानराज चौगुले या आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे हे राजकारणातून निवृत्त होणार, असं सध्या तरी चित्र नाही.
हेही वाचा – Election Result 2024 : महायुतीचा विजय, पण निकालाविरोधात सरोदे न्यायालयात मागणार दाद