घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर ठरणार राजकारणाचे केंद्र; मविआच्या सभे पाठोपाठ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा

छत्रपती संभाजीनगर ठरणार राजकारणाचे केंद्र; मविआच्या सभे पाठोपाठ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा

Subscribe

पूर्वीचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) राजकारणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे . महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची संयुक्त सभा २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात तिन्ही पक्ष राज्यभर एकत्रित सभा घेणार आहेत. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे राज्यभर धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. याची सुरुवात ८-९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधूनच होणार आहे.

एकानाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसनेत फुट पाडून सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. रविवारी मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंंची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माझ्यावर आरोप झाले तर मी उत्तर सभा घेणार असे आव्हान शिंदे सरकारमधील बंदरे मंत्री दादा भूसे यांनी दिले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सभे पाठोपाठ शिंदेंच्या सभा आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडीही राज्यभर दौरा करणार आहे. त्यालाच उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रा काढत आहे. उद्धव ठाकरेंची नुकतीच रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. त्यानंतर काही दिवसांतच त्याच गोळीबार मैदानावर एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मागे-मागे जात त्यांच्या नंतर सभा घेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केले आहे. मात्र राज यांचा सल्ला शिंदेंना पटलेला दिसत नाही.

- Advertisement -

महाविकास आघाडीची मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर २ एप्रिलला सभा होणार आहे. या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. आता त्याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे. त्यांच्या सभेला किती गर्दी जमते याची उत्सूकता असणार आहे. कारण या जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेतून फुटून सरकार स्थापन केल्यानंतर शिंदेंची पहिली जाहीर सभा ही तत्कालिन सिल्लोडमध्ये झाली होती. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदेची धनुष्यबाण यात्रा ही छत्रपती संभाजीनगरमधूनच सुरु होणार आहे.

एकनाथ शिंदेंना छत्रपती संभाजीनगरने मोठी साथ दिली आहे. जिल्ह्यातील पाच आमदार त्यात, अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि प्रा. रमेश बोरणारे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंसोबत गेले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे हे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे अतुल सावे असे तीन मंत्रिपदे मिळालेली आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद छत्रपती संभाजीनगरचे अंबादास दानवे यांच्याकडे दिले आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर पूर्वीपासून राजकीयदृष्ट्य महत्त्वाचा जिल्हा राहिला आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून या शहराकडे पाहिले जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात पडतात. अवघा महाराष्ट्र इथे घडलेल्या घटनांची दखल घेतो. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. आता येथे एआयएमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहे. तरीही शिवसेनेची पाळेमुळे घट्ट आहेत. शहराच्या नामांतरानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा २ एप्रिलला होणार आहे तर ८ आणि ९ एप्रिलला एकनाथ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा याच शहरातून सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन आणि नेत्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -