घरमहाराष्ट्रशिवसेना विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंना पहिली पसंती!

शिवसेना विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंना पहिली पसंती!

Subscribe

आज आमदारांच्या बैठकीत होणार निवड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक गुरुवारी दुपारी १२ वाजता शिवसेना भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना विधिमंडळ नेत्याच्या घोषणा करणार आहेत. या पदावर शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या नावाची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे हीच मातोश्रीची पहिली पसंती असल्याचे चित्र आहे.

या बैठकीला शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार, समर्थक प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आणि अपक्ष आमदार उपस्थित रहाणार आहेत. एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही प्रमुखांना पसंतीस पडणारे आहेत. निवडणुकीच्या अगोदर राज्यभर झालेल्या आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शिंदे यांचे मोठे योगदान होते. मातोश्रीने सोपवलेली प्रत्येक कामगिरी मोठ्या निष्ठेने आणि यशस्वीपणे शिंदे यांनी पार पाडली आहे. शिवाय सत्ता असताना आणि नसतानाही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना कायम मोठा आधार देण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. शिंदे हे लोकनेता असून त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षात मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी असायची, ही त्यांच्या कामाची पोचपावती होती.

- Advertisement -

विशेष म्हणजे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री म्हणून शिंदे यांचे नाव पुढे आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यात चांगला समन्वय असून तो वेळोवेळी दिसला आहे. भविष्यात याचा मोठा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो. पुढच्या पाच वर्षांत शिवसेनेला राज्यभर आपला पसारा वाढवायचा असेल तर शिंदे यांच्यासारखा नेता विधिमंडळ नेतेपदी असणे गरजेचे आहे, असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

दुसर्‍या बाजूला शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे गेल्यानंतर पक्षप्रमुखांनाही तितकीच समर्थ साथ दिली. राज ठाकरे आणि नारायण राणे पक्ष सोडून गेल्यानंतर शिवसेनेचे काय होणार, असे वाटत असताना सुभाष देसाई यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचे मार्गदर्शन उद्धव यांच्यासाठी फायदेशीर ठरले. मात्र लोकनेता म्हणून त्यांची ओळख नसल्याने त्याचा पुढे किती फायदा होऊ शकतो, ही शंका आहे. दुसरे म्हणजे देसाई हे विधान परिषदेवर निवडून आले असून त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करायची असल्यास सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून आणावे लागेल.

- Advertisement -

ठाकरे घराण्यातील पहिले आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांचेही नवा सुचवले जाऊ शकते. पण ते पहिल्यांदाच विधिमंडळात जात असून अशा वेळी त्यांना अतिशय महत्वाच्या पदावर काम करताना अनुभवी आणि आक्रमक विरोधकांचा मोठा मुकाबला करावा लागेल. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ते झाकोळले जाऊ शकतात. यापेक्षा दोन एक वर्षे अनुभव घेऊन पुढे विधिमंडळ नेते म्हणून ते समर्थपणे काम करू शकतील, असे मत राजकीय अभ्यासक अभय देशपांडे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -